Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीसाठी आता महिन्याभराचा कालावधी उरला असतानाच सत्ताकारण नवनवीन वळणांवर येताना दिसत आहे. काय आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि लक्ष देण्याजोग्या घडामोडी... पाहा एका क्लिकवर....
21 Oct 2024, 20:55 वाजता
पुणे-सातारा महामार्गावरील टोलनाक्यावर पकडली 5 कोटींची रोकड
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोलनाक्यावर जवळपास पाच कोटी रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे. कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही मोठी रोकड पकडण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी चेक पोस्ट दरम्यान कारवाई केली. हा पैशांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रोकड मोजायचं काम सध्या सुरू आहे. हे पैसे कुठे नेले जात होते? याची चौकशी सुरू आहे. टोलनाक्यावरील चे पोस्ट दरम्यान गाडी चेक केली असता ही रोकड गाडीत मिळाली.
21 Oct 2024, 20:21 वाजता
नाराज राज पुरोहित बंडखोरीच्या तयारीत?
भाजपचे कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित 'सागर'वर दाखल झाले होते ,परंतु फडवणीस यांनी उद्या सकाळी 11 वाजता भेटण्याची वेळ दिलीय. कुलाबा येथून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. 2019 च्या निवडणुकीत राज पुरोहित यांचा पत्ता कट करत भाजपने नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती यंदा नार्वेकर यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. राज पुरोहित नाराज असल्याने बंडखोरी करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
21 Oct 2024, 18:42 वाजता
ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसलाय. बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर हे आरोपी
आहेत. दीपक बडगुजर यांच्यावर मोक्काची कारवाई झाल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिम मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहेत.
21 Oct 2024, 17:34 वाजता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासगी स्वीय सचिव लढवणार निवडणूक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी स्वीय सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुखेड मतदार संघाची जागा भाजपाने विद्यमान आमदार तुषार राठोड यांना जाहीर केल्याने त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली. खासगी सचिवपदाचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची त्यांनी घोषणा केली. समर्थकांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
21 Oct 2024, 16:23 वाजता
सांगली भाजपामध्ये बंडखोरीला सुरुवात
सांगली भाजपामध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. भाजपाचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष लढणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.
विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही बंडखोरी उफळली. गेली 10 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही अन्याय केल्याचा आरोप शिवाजी डोंगरे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन उमेदवारी डावलल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी अमान्य करीत बंडखोरीचा निर्धार त्यांनी केलाय.
21 Oct 2024, 15:11 वाजता
राजवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरेंनी बारामतीत घेतली शर्मिला पवारांची भेट
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आज बारामतीत शर्मिला पवार यांची भेट घेतलीय. शर्मिला पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सखे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी असून युगेंद्र पवार यांच्या त्या आई आहेत.शर्मिला पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात बारामती लोकसभेला प्रचार केला होता आणि त्यांचा संपर्क इंदापुरात देखील मोठ्या प्रमाणावर आहे.आगामी इंदापूर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय.
21 Oct 2024, 14:11 वाजता
रोहित पाटील 24 ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज
सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित आर आर पाटील हे 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.कवठेमहांकाळ मध्ये पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणार जवळपास निश्चित आहे.तासगाव मधल्या तहसील कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता रोहित पाटील शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
21 Oct 2024, 14:01 वाजता
उदय सांगळे शरद पवारांच्या भेटीला
एकेकाळचे शिवसेना मंत्री दादा भुसेंचे कट्टर समर्थक असलेले उदय सांगळे थोड्याच वेळात वाय बी सेंटरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते सिन्नर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
21 Oct 2024, 13:46 वाजता
ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस वादावर शरद पवार यांची मध्यस्थी
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे वादावर शरद पवार यांची मध्यस्थी. रविवारी आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी शरद पवार यांची भेट घेऊन जागावाटपातील काँग्रेसच्या आडमुठी भूमिकेबद्दल माहिती दिली. त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडशी बोलून या वादावर मध्यस्थी केल्याची माहिती.
21 Oct 2024, 13:40 वाजता
महायुतीमधील अंधेरी पूर्व आणि दिंडोशी मतदारसंघातील तिढा कायम
मुंबईतील अंधेरी पूर्व मतदार संघातून भाजपचे मुरजी पटेल हे इच्छुक आहेत. याच मतदार संघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वीकृती प्रदीप शर्मा इच्छुक आहेत. महायुतीमध्ये स्वीकृती प्रदीप शर्मा यांना दिंडोशी मधून निवडणूक लढवावी अशी ऑफर दिली होती. मात्र स्वीकृती शर्माया दिंडोशी मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून संजय निरुपम, दिंडोशी विभाग प्रमुख गणेश शिंदे आणि वैभव भराडकर इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीसाठी अंधेरी विधानसभा मतदारसंघत तिढा अजूनही कायम आहे . तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी पक्षांतर्गत अडचणी या दिंडोशी मतदारसंघात आहेत.