भाजपच्या अंतर्गत बैठकीत वाद; महाजनांसमोरच रक्षा खडसे यांच्यावर कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप

Lok Sabha Election: रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहिर झाल्यापासून भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर, आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Updated: Mar 26, 2024, 12:38 PM IST
भाजपच्या अंतर्गत बैठकीत वाद; महाजनांसमोरच रक्षा खडसे यांच्यावर कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप title=
Lok Sabha Election bjp activists angry on candidate Raksha Khadse infront of girish mahajan

Loksabha Election: भाजपने जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र, रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळताच मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काहींनी ही नाराजी उघडपणे बोलूनदेखील दाखवली आहे. आता जळगावच्या भाजपच्या अंतर्गंत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाल्याचे समोर आले आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भाजपच्या अंतर्गंत बैठकीत झालेल्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांना डावलले जात असून रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरतात, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केला आहे. गिरीश महाजन यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडल्याने रावेर मतदारसंघातील अंतर्गंत वाद चव्हाट्यावर आला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत रक्षा खडसे आणि गिरीश महाजन याच्यासमोरच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसले आहेत. त्यावेळी त्यांनी रक्षा महाजन या  एकनाथ खडसे यांचे नाव घेतात गिरीश महाजन यांचं नाव का घेत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जवळ केले जाते, असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे. रक्षा खडसे आणि भाजप कार्यकर्त्यांमधील हा वाद सुरू असताना एकीकडे गिरीश महाजन दोघांनाही शांत करताना दिसत आहेत. 

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

व्हिडिओत कार्यकर्ते म्हणताना दिसताहेत की, आम्ही मतदान भाजपलाच करु 101 टक्के कमळ निवडून येणार. पण कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. तुम्ही एकनाथ खडसे यांचे नाव घेतात, पण गिरीश महाजन यांचे नाव घेत नाहीत?, असा थेट आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या आरोपांवर रक्षा खडसे यांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरुन नाराजी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत त्यांना प्रचंड विरोध होत आहे. 2014 मध्ये कुठलेही कारण न देता तत्कालीन भाजपचे विद्यमान खासदार दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्याची पुनरावृत्ती 2024 मध्ये घडली असून भाजपचे दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना भाजपने उमेदवारी न देता पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे.