लोकसभा निवडणुकीआधी मोठी घडामोड, संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार... 'हे' आहे कारण

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. संभाजी राजे छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्यांचा स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाहीए.  

प्रताप नाईक | Updated: Mar 6, 2024, 02:12 PM IST
लोकसभा निवडणुकीआधी मोठी घडामोड, संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार... 'हे' आहे कारण title=

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असतानाच संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मोठी घोषणा केली आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष (Swarajya Party) राज्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही असं संभाजी राजे यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारात 100 टक्के उतरणार असल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलंय. माझ्यासाठी माझे वडिलच सर्वस्व आहेत, वडिलांसाठी आपण निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचं संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) उभा राहायचं निश्चित होतं, मात्र ज्यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि आमचे वडील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमचा प्रश्नच येत नाही, असं संभाजी राजेंनी म्हटलंय. शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केलं असतं तर महाराज यांच्या प्रचारात 110 टक्के काम करणार, जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहे, निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही कष्ट करण्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही असं संभाजी राजे यांनी स्पष्ट केलं आहे.

शाहू महाराज, मालोजीराजे आणि मी एकत्रितपणे या निवडणुकीत काम करणार आहे. कोल्हापूर हे नेहमी वेगळी दिशा देणारं शहर आहे ते नेहमीचं देत राहणार. कोल्हापूरची निवडणूक आमच्यासाठी महत्वाची आहे. कोल्हापूरकरांची आणि शाहू महाराज यांची इच्छा आम्ही सगळे मिळून पूर्ण करू असा ठाम विश्वास यावेळी संभाजी राजे यांनी व्यक्त केला. हीच खरी वेळ आहे की पूर्ण ताकतीने काम करण्याची आणि त्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेनं काम करणार. शाहू महाराज हे आमच्यासाठी सर्वस्व आहेत 

घर किती एकसंघ आहे मी पोस्ट केलेल्या फोटोवरून लक्षात आलं असेल. शाहू महाराज यांचे वय विचारता मग मोदी यांचे वय काय आहे? असा सवाल यावेळी संभाजी राजे यांनी उपस्थित केला. शाहू महाराज यांनी या निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेत याचा त्यानी विचार केला असेल.कोल्हापूर मतदार संघात पूर्ण क्षमतेने फिरतील, पैलवान आहेत ते आजही त्यांचा खूप प्रवास असतो. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल याचा विचार आम्ही करतोय असंही संभाजी राजे यांनी सांगितलं.

कोल्हापूरातून शाहू महाराज निश्चित
कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज हेच महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालं आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा शाहू महाराज छत्रपती यांनी लढवावी याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवेसना ठाकरे गटात एकमत आहे. मात्र कोणत्या पक्षाच्या चिन्हावर शाहू महाराजांनी ही जागा लढवावी हे अद्याप निश्चित झालं नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.