शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार

राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंना पक्षात घेतल्यामुळे शिरूरच्या सत्ताचक्राचं समीकरण बदललं आहे.

Updated: Mar 4, 2019, 07:12 PM IST
शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार  title=

हेमंत चापुडे, शिरुर : पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा समजला जातो. शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर विद्यमान खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांचा मार्ग सुकर असेल असं वाटत असतानाच भाजपमधून या जागेवर दावा सांगितला जावू लागला आहे. शिवाय राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंना पक्षात घेतल्यामुळे शिरूरच्या सत्ताचक्राचं समीकरण बदललं आहे. पुणे जिल्ह्यातला शिरुर लोकसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवाजीराव अढळराव पाटील यांना पराभूत करणं राष्ट्रवादीला जमलेलं नाही. मात्र आता मतदारसंघातील गणितं बदलली आहेत.

शिरुरमध्ये गेल्या ५ वर्षांत भाजपाची ताकद वाढली आहे. हडपसर, शिरुर आणि भोसरी विधानसभा, राजगुरुनगर, आळंदी नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती येथे भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हा मतदारसंघ मिळवण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.  

याबाबत उद्धव ठाकरे आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं शिवाजीराव अढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे प्रख्यात अभिनेते अमोल कोल्हे यांना पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीनं दोन्ही पक्षांना गुगली टाकली आहे. शिरुर मतदारसंघातील गणितं कोल्हेंमुळे बदलली आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले कोल्हे युतीला टक्कर देऊ शकतात. आता युतीमध्ये जागा कुणाला मिळणार आणि कोल्हेंना कशी टक्कर देणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.