'आघाडीला उमेदवार मिळेना, कॅप्टनची माढ्यातून माघार', मुख्यमंत्र्यांचा निशाणा

भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला.

Updated: Mar 24, 2019, 09:41 PM IST
'आघाडीला उमेदवार मिळेना, कॅप्टनची माढ्यातून माघार', मुख्यमंत्र्यांचा निशाणा title=

कोल्हापूर : भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी अंबाबाईचं एकत्रित दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निवडणूक लढायला तयार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारतीय सैन्याच्या कामगिरीवर संशय घेणाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांनी टीकेची तोफ डागली. तर शिवसेना-भाजपा युती म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तुटणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी राज्याच्या जनतेला दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला उमेदवार मिळत नाहीत. कॅप्टननेही माढ्यातून माघार घेतली आहे. जे कॅप्टन आधी ओपनिंग बॅट्समन म्हणून यायला निघाले होते, ते आता नॉन प्लेयिंग कॅप्टन बारावा गडी म्हणून काम करत आहेत. आघाडीचे उमेदवार तिकीटं परत करत आहेत. रोज त्यांची तिकीटं बदलली जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जगभरामध्ये फक्त पाकिस्तान, काँग्रेस आणि त्यांचे कच्चे-बच्चे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात. फक्त नावात राष्ट्रवादी असून चालत नाही तर मनात राष्ट्रवाद असावा लागतो, असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.