माढा : या मतदासंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. २००९ च्या मतदारसंघ फेररचनेत पूर्वीचा पंढरपूर लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असताना १९७७ पासून १९९९ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. अर्थात त्यामागे मोहिते पाटील घराण्याची मोठी ताकद होती. १९९९ ला शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मोहिते पाटीलही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर रामदास आठवले १९९९ आणि २००४ असे दोन वेळा चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. २००९ ला विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढायला इच्छुक होते. मात्र राजकीय सत्ता संघर्षातून त्यांना माघार घ्यावी लागली आणि शरद पवार तीन लाख मताधिक्यानं निवडून आले. २०१४ ला मोदी लाटेचा अंदाज घेत शरद पवारांनी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणं पसंत केलं. माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील सदाभाऊ खोतांना मात देत खासदार झाले.
आधी आपण स्वतः निवडणूक लढणार असल्याचं पवारांनी सांगितलं. त्यामुळे मोहिते पाटलांसह पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले. मात्र ऐनवेळी पवारांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि माढ्याचा तिढा वाढवला. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढवावी असं पवारांचं मत होतं. मात्र विजयसिंह आपल्या मुलाच्या नावासाठी आग्रही होते. रणजितसिंह यांच्या उमेदवारीला माढ्यातील राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध सुरू केला. हा विरोध शांत करण्यासाठी पवारांनी किंवा राष्ट्रवादीनेही कोणतेच प्रयत्न केले नाहीत. परिणामी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून २० वर्ष पवारांची साथ देणारे विजयसिंह मोहिते-पाटील प्रचंड नाराज झाले आणि ते पक्षापासून दुरावले. अखेर रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माढ्यातल्या लढाईचं स्वरुप आता भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असं नसून मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादी असं होणार आहे. मोहिते पाटलांना विरोध असलेले राष्ट्रवादीचे सर्व गट आता एकत्र येऊ शकतील. मात्र तरीही ही लढाई सोपी राहणार नाही.
भाजपने या मतदारसंघात रणजीतसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून संजय शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहे. बहुजन वंचित आघाडीने विजय मोरे यांना मैदानात उतरवलं आहे. २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महायुतीचे उमेदवार आणि सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव झाला होता. या लढतीत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
विजयसिंह मोहिते पाटील | राष्ट्रवादी | 489989 |
सदाभाऊ खोत | स्वा. शे. संघटना | 464645 |
प्रतापसिंग मोहित पाटील | अपक्ष | 25187 |
कुंदन बनसोडे | बसपा | 15790 |
नवनाथ पाटील | हिंदुस्थान प्रजा पक्ष | 8853 |