Sanjay Raut On Loksabha Election 2024: महायुतीमध्ये जागावाटपावरुन चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरुच आहे. अवघ्या हातावर मोजण्याइतक्या जागांसंदर्भातील निर्णय शिल्लक असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. असं असतानाच या जागावाटपाच्या संदर्भात विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना एक प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून काहीही झालं तरी ज्या उमेदवारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे तो पुढील लोकसभेमध्ये नसेल असा दावा केला आहे.
माहविकास आघाडीने आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. शिवसेना उद्धव ठाकरे गट 21 जागांवर, काँग्रेस 17 जागांवर तर शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. मात्र या पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी सकाळीच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी एकच मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदारपुत्र असलेल्या श्रींकात शिंदेंच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये सुरु असलेल्या गोंधळासंदर्भात होता. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख केला.
पत्रकारांनी संजय राऊत यांना श्रीकांत शिंदेंचा उल्लेख करत प्रश्न विचारताना, "त्यांची उमेदवारी फडणवीसांनी घोषित केली. ते कल्याणचे उमेदवार आहे असं फडणवीसांनी घोषित केलं. पण श्रीकांत शिंदे भाषणात म्हणतात की माझी उमेदवारी अजून मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली नाही. हा अविश्वास आहे का?" असा सवाल केला. यावर "मी कसं काय सांगणार?" असं उत्तर राऊत यांनी दिली.
नक्की वाचा >> राज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत? प्रश्न ऐकताच राऊतांचं 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांना...'
त्यानंतर पुढे बोलताना राऊत यांनी, "मला इतकेच माहिती आहे की पुढल्या लोकसभेते ते (श्रीकांत शिंदे) नसतील," असा दावा केला. "त्यांची उमेदवारी नरेंद्र मोदींनी घोषित केली किंवा अमित शाहांनी घोषित केली तरी मी खात्रीने सांगतो पुढल्या लोकसभेमध्ये ते नसतील," असं म्हणत राऊत पत्रकार परिषदेतील पोडीयमवरुन चालत निघून गेले.
नक्की वाचा >> 'मोदी उद्धव ठाकरेंना घाबरतात, म्हणूनच..'; राऊतांचा दावा! म्हणाले, 'ज्यापद्धतीने ते लटपटत..'
कल्याण हा श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ असून मागील 2 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. यंदा त्यांना हॅटट्रीक साधण्याची संधी आहे. भाजपाकडून शिंदेंना समर्थन दिलं जाईल असं जाहीर करण्यात आलं असून फडणवीस यांनीही आम्ही श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणू असं म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे ठाकरे गटाने पूर्वीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. वैशाली दरेकर यांचं नाव फारसं चर्चेत नसताना अचानक त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. 2009 पूर्वी वैशाली दरेकर शिवसेनेमध्ये होत्या. त्यानंतर त्या मनसेत गेल्या. मात्र 2016 मध्ये त्या पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्या. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वैशाली यांनी यापूर्वी विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. वैशाली दरेकर यांनी 2009 साली कल्याण मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. 2010 साली त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढली आणि त्या निवडून आल्या.