Loksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल

Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत.   

सायली पाटील | Updated: Mar 27, 2024, 01:12 PM IST
Loksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल  title=
Loksabha Election 2024 Sunetra pawar stands for Ajit pawar ncp news latest political update

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असतानाच राज्यातील काही महत्त्वाच्या मददार संघांमधील घडामोडींनाही प्रचंड वेग मिळताना दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्याच्या राजकीय पटलावर बारामती लोकसभा मतदार संघावकर अनेकांची नजर असून, खुद्द अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आता इथं सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

पुढील दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर होणार असून, त्यामध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं स्पष्ट वक्तव्य अजित पवार यांनी केलं आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर  जवळपास शिक्कामोर्तब झालं. सुनेत्रा पवारही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिनं गावखेड्यांमध्ये जात जनसामान्यांच्या भेटी घेताना दिसल्या आणि आता त्यांनी ठामपणे आपलीही राजकीय भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं. 

गावांमध्ये जाऊन भेटीगाठींच्या या सत्रादरम्यान अजित पवार यांच्या पत्नीकडून त्यांच्या राजकीय भूमिकेच समर्थन करत सासरे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सवाल करण्यात आला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर शरद पवार आणि समर्थकांनी त्यांच्यावर पक्ष चोरला अशा शब्दांत टीका केली. याच टीकेचं उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिलं. 

'अनेक वर्षांपासून पवार साहेबही सांगत आले की व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकालाच मिळालं पाहिजे आपण सर्वजण त्याबद्दल बोलतो आणि लोकशाहीच्या गोष्टी ऐकतो. याच लोकशाहीत दादांच्या भूमिकेसोबत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारी जवळपास 80 टक्के लोक आले. मग त्यांनी पक्ष चोरला कसं म्हणता?' असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर पहिल्यांदाच भाष्य केलं. श्रीकृष्णाविरोधात सारी भावकी होती. पण अखेर जिंकला तो कृष्णच अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

हेसुद्धा वाचा : 'घरात चोरी झाली म्हणून आपण...', पक्ष चिन्ह, नावावरुन 'होसलेस चोरी' म्हणत शरद पवारांचा टोला

अजित पवार यांनी सरकारशी हातमिलवलणी करण्यामागचा हेतूही त्यांनी सामान्यांपुढे मांडला. 'सरकारमध्ये असलं तरच आपण काम करू शकतो, आदरणीय मोदी साहेबांना साथ द्यायची असेल आणि तळागाळातील जनतेचा विकास करायचा असेल तर आपण ससरकारसोबत असणं गरजेचं आहे. राज्यात आणि केंद्रात आपली माणसं असणं गरजेचं आहे', हा अजित पवार यांचा विचार सर्वांपुढे मांडताना यंदाच्या निवडणुकीत घड्याळाला म्हणजेच विकासाला मत द्या असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं. 

जनसामान्यांना उद्देशून, 'तुम्ही  सर्वांनीच आम्हा कुटुंबीयांना साथ दिली; प्रेम दिलं. तुमचं प्रेम हीच आमची उर्जा आहे. येणाऱ्या काळात आम्हाला तुमची हीच साथ अपेक्षित आहे त्यामुळं हेच पाठबळ कायम ठेवा' अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.