महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- प्रकाश आंबेडकरांची टीका

LokSabha Election:  मुस्लिम उमेदवार न दिल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

Updated: Apr 14, 2024, 02:17 PM IST
महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही-  प्रकाश आंबेडकरांची टीका title=
Prakash Ambedkar On MVA

LokSabha Election: प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार अशा चर्चा सुरु असताना दोघांची बोलणी फिस्कटली. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे. वंचित आघाडी भाजपला पाठींबा देत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आंबेडकर जयंती निमित्त ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

मुस्लिमांची केवळ मते हवी आहेत

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलीय ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाविकास आघाडीने अद्याप एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल, तर दोघांमध्ये काय फरक आहे?असा प्रश्न त्यांनी विचारला. प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडी आणि भाजपला मुस्लिमांची केवळ मते हवी आहेत पण त्यांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलेले नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

शरद पवारांवर टीका 

वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार प्रफुल लोढा यांनी शरद पवारां यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत इतके वर्ष काम केले मात्र रावेर लोकसभेची उमेदवारी शरद पवारांनी मला नाकारली. शरद पवारांचे जैसे कर्म आहेत तसे त्यांना फळ मिळत आहे. एका अल्पसंख्यांक माणसावर त्यांनी अन्याय केला.  मी उमेदवारी मागितली तेव्हा त्यांनी मला तुम्ही पार्टीचे सभासद नाही असे सांगितले मात्र आज ते त्यांच्या पार्टीचे सभासद नाहीत. जगात देव सर्वांचा न्याय करतो त्यांनी शरद पवार यांच्यावर वाईट वेळ आणल्याचे लोढा म्हणाले.