कमळाला पानगळती, शिवसेनेत इनकमिंग वाढले; चार आले आणखीही येणार

भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह तीन नगरसेवकांनी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आपल्या हाती शिवबंधन बांधले.

Updated: Feb 26, 2022, 10:53 AM IST
कमळाला पानगळती, शिवसेनेत इनकमिंग वाढले; चार आले आणखीही येणार title=

नाशिक : shivsena news : शिवसेनेत इनकमिंग सुरु झाले आहे. माजी आमदार वसंत गीते यांचे चिरंजीव आणि भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी आज भाजपला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. 

सह्याद्री अतिथीगृह येथे हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. भाजप नगरसेविका हेमलता कांडेकर, जयश्री ताजणे, अपक्ष नगरसेवक मुसीर सय्यद यांच्यासह भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शंभू सुनील बागूल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नाशिक दौऱ्याआधीच हा प्रवेशसोहळा झाल्यामुळे भाजपचे पदाधिकारी चिंतेत आहेत. तर, मोठ्या संख्येने शिवसेनेत इनकमिंग सुरु असल्यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे, भाजप नगरसेविका पल्लवी पाटील, शशिकांत जाधव, विशाल संगमनेरे हे ही भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत आहेत. लवकरच हे नगरसेवक शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

समाजकारणासाठी शिवसेनेत - आदित्य ठाकरे
वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी त्यांचा पक्ष सोडून शिवसेनेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना समाजकारणातून राजकारण करायचं असल्यानं ते शिवसेनेत येत असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

निवडणुका जवळ आल्या की भाजपच्या अगोदर या यंत्रणा आपले काम सुरु करतात. त्यानुसार ही यंत्रणाही आता आपले काम करत आहे. पण, अंतिम विजयी सत्य का होता है, असेही ते म्हणाले.