देवेंद्र फडणवीस यांच्यासह गळाभेट; महादेव जानकर बारामतीमधून लढणार?

शरद पवारांना धक्का बसला आहे. रासपचे महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत.

Updated: Mar 24, 2024, 09:19 PM IST
देवेंद्र फडणवीस यांच्यासह गळाभेट; महादेव जानकर बारामतीमधून लढणार? title=

Mahadev Jankar : शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत. महादेव जानकरांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. वर्षावर झालेल्या या बैठकीत जानकरांनी महायुती सोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना एक जागा दिली जाणार आहे. 

एक जागा बारामतीची असणार का? 

आता ती एक जागा बारामतीची असणार का? महादेव जानकर बारामतीतून लढणार का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर 69 हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यांना बारामतीतून उमेदवारी दिल्यास धनगर समाजाच्या मतांवर प्रभाव पडू शकतो. याशिवाय सध्या विजय शिवतारेंनी अजित पवारांना दर्शवलेला विरोध, हर्षवर्धन पाटील, अनंतराव थोपटेंची नाराजी..या सगळ्या नाराजांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांऐवजी जानकरांना बारामतीचं तिकीट मिळू शकतं असाही एक अंदाज लावला जातोय.

मविआकडून रासप नेते महादेव जानकरांची उमेदवारी निश्चित झाली होती

माढा लोकसभा मतदारसंघात मविआकडून रासप नेते महादेव जानकरांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांची कोंडी झालीय. भाजपनं मोहिते पाटलांच्या दबावतंत्राकडे दुर्लक्ष केलं. आणि रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट दिलं. तर मविआकडूनही जानकरांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे मोहिते पाटलांची कोंडी झाली. मात्र, आता महादेव जानकर महायुतीत सहभागी झाल्याने मोठा ट्विस्ट आला आहे. 

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात मोठी घडामोड मुंबईत घडतेय... भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत बैठक होणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर ही बैठक पार पडेल.. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातले मनभेद कमी करण्यासाठी ही बैठक होणार आहे... अजित पवार गटाकडून जाहीर धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला होता.. तर आधी विधानसभेचा शब्द द्या, नंतर लोकसभेचे पाहू असा आक्रमक पवित्रा हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी घेतला होता.. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची याआधीच बैठक पार पडली होती.