मुंबई : महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल ८,१६९ रुग्ण वाढले आहेत, तर २२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २,४६,६०० एवढा आहे. यातले ९९,२०२ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत, तर १,३६९८५ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५५.५५ टक्के एवढं झालं आहे.
राज्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजारांच्यावर गेली आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १०,११६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर ४.१ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक ५,२४४ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर मुंबई आणि ठाणे मिळून कोरोनाने ७,१७९ जणांचा बळी घेतला आहे. पुणे मंडळामध्ये १,४६९ जणांचा आणि नाशिक मंडळात ७३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.