मुंबई : महाराष्ट्रामध्ये एका दिवसात कोरोनाचे १,५७६ रुग्ण वाढले आहेत. तर मागच्या २४ तासात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २९,१०० एवढी झाली आहे. आजच्या दिवसभरात कोरोनाच्या ५०५ रुग्णांना बरे झाल्यामुळे सोडण्यात आलं. आत्तापर्यंत राज्यातले एकूण ६,५६४ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यामुळे घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १,०६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग ११ दिवस एवढा झाला आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे १७,६७१ रुग्ण झाले आहेत, तर ६५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या ४९ मृत्यूंपैकी ३४ मुंबईत, पुण्यातले ६, अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये २, धुळ्यात २, पनवेलमध्ये १, जळगावमध्ये १ आणि औरंगाबादमध्ये १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये २९ पुरुष तर २० महिलांचा समावेश आहे. आजच्या मृत्यूंमधले २२ रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्तचे आहेत. तर २३ रुग्ण ४० ते ५९ या वयातील आहेत. ४ जण ४० वर्षांखालील आहेत. ४९ मृत्यूंपैकी ३२ जणांना मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयरोग असे अतीजोखमीचे आजार होते.