Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To Raj Thackeray MNS: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व जागा लढवण्याची घोषणा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनी ना युती ना आघाडी असं धोरण जाहीर केलं होतं. राज ठाकरेंनी त्यानंतर सात वेगवेगळ्या याद्यांमधून मनसेचे उमेदवार जाहीर केले. मनसेनं यंदाच्या निवडणुकीमध्ये एकूण 138 उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंच्या एका सहकाऱ्याला निवडणुकीमध्ये जनतेच्या दारात जाऊन कौल मागण्याआधीच अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा मनसेकडून 137 उमेदवारच आपलं नशीब मतपेटीतून आजमावणार आहेत हे स्पष्ट झालं आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदारसंघातून राज ठाकरेंच्या पक्षाने प्रशंसा आंबेरे यांना संधी दिली. प्रशांत आंबेरे यांनी आपल्या उमेदवारीचा रितसर अर्ज दाखल केला. मात्र तपासणीदरम्यान प्रशांत यांचा अर्ज रद्द करम्यात आला आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मनसेचे उमेदवार प्रशांत अंबेरेंचा अर्ज का रद्द करण्यात आला याबद्दल मनसैनिकांमध्ये संभ्रम असला तरी ते निवडणूक आयोगाच्या निकषांना पूर्ण करणारी एका महत्त्वाच्या अटीत बसत नसल्याचं अर्जाच्या छाणणीदरम्यान निष्पन्न झालं आहे. नियमानुसार विधानसभेच्या निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची अट घातली आहे. मात्र अकोला पश्चिमचे मनसे उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचं वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्याने यांचा नामांकन अर्ज छाणनीदरम्यान बाद करण्यात आला आहे. मनसेकडून उमेदवारी मिळालेल्या प्रशांत अंबेरेंना वयाची 25 पूर्ण करण्यासाठी अवघे 24 दिवस कमी पडले आहेत. मात्र वयाची अट ही मूलभूत अट असल्याने प्रशांत अंबेरेंना थेट अपात्र ठरवण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...
अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी 100 जणांनी 128 अर्ज सादर केले. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 129 उमेदवारांनी 180 अर्ज दाखल केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अकोट मतदारसंघात एकूण 22 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले आहेत. बाळापूर मतदारसंघात एकूण 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले. अकोला पश्चिम मतदारसंघात 23 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले आहेत. अकोला पूर्व मतदारसंघात एकूण 23 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत 32 व्यक्तींनी 38 अर्ज दाखल केले. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत.