'मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित', आज किंवा उद्या..; BJP च्या ज्येष्ठ नेत्याची माहिती

Maharashtra Assembly Election 2024 Next CM of State: विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत. मात्र महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 2, 2024, 08:07 AM IST
'मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित', आज किंवा उद्या..; BJP च्या ज्येष्ठ नेत्याची माहिती title=
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली माहिती (फोटो फेसबुकवरुन साभार)

Maharashtra Assembly Election 2024 Next CM of State: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कारभार हाती घेणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. आज किंवा उद्या भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडणार असून या निर्णयासंदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 

...म्हणून तातडीने निर्णय आवश्यक

पीटीआयच्या वृत्तानुसार, या नेत्याने फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून निश्चित झालं असून 2 किंवा 3 डिसेंबर रोजी त्यांची गटनेता म्हणून निवड केली जाणार आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार यावरुन खलबतं सुरु आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेदरम्यान यावरुन दावे-प्रतिदावे केले जात होते. तर दुसरीकडे सत्तेतील वाटा कसा मिळणार याबद्दल शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाबरोबर चर्चा सुरु आहे. मात्र या साऱ्या चर्चेदरम्यान विधानसभेची मुदत 26 तारखेलाच संपली असून सध्या राज्याच्या कारभार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाळत आहेत. त्यामुळेच लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची निवड करण्यासाठी आता वेगाने हलचाली सुरु झाल्या आहेत.

शिंदेंचं समर्थन

नुकताच आपल्या पदाचा राजीनामा देऊन काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, भाजपा मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करेल त्याला आपला पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे. शिंदेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतरही अशीच प्रतिक्रिया नोंदवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदेंनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. दुसरीकडे अजित पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री हा भाजपाचा असेल असं म्हणत आपला पाठिंबा जाहीर केलं आहे.

नक्की वाचा >> पहिल्यांदाच निवडून आलेल्या RR पाटलांच्या लेकावर पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी; आता विधानसभेत...

"देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून निश्चित झालं आहे. भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक 2 किंवा 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या बैठकीमध्येच भाजपाचा गटनेता निवडला जाईल," अशी माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआयशी बोलताना दिली.

गृहमंत्री पदासंदर्भात संभ्रम कायम

दिल्लीमध्ये अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं गृहमंत्री पदाची मागणी केली होती. मात्र भाजपाने गृहमंत्री पद सोडण्यास नकार दिला आहे. पण राज्याचं गृहमंत्रिपद हे 2014 ते 2019 प्रमाणेच मुख्यमंत्र्यांकडे राहणार की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींकडे सोपवल्या जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे अजित पवारांकडे अर्थ खातं असल्याने त्यावर शिंदेंच्या पक्षाला दावा सांगता आलेला नाही. त्यामुळेच आता शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाकडून जास्तीत जास्त महत्त्वाची खाती आपल्याकडे खेचून घेण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.