Maharashtra Assembly Election 2024: "सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?" असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर रोहित पवार यांनी कथितरित्या या छापेमारीमध्ये सापडलेली कॅशचा व्हिडीओही शेअर केला आहे.
शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्मयांशी बोलताना, "अशी एकच काडी सापडली अन्य गाड्या कुठे आहेत?" असा प्रश्न विचारला आहे. तसेच रोहित पवार यांनी रुग्णवाहिकांमधून पैसे पोहचवले जात असल्याचा आरोपही केला आहे. सत्ताधारी उमेदवारांना पहिला हफ्ता मिळाल्याचा दावाही रोहित पवारांनी केला आहे. खेड-शिवापूर टोलानाक्यावर जप्त करण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांच्या रोख रक्कम ही शहाजी बापू पाटलांच्या मालकीची होती अशी चर्चा असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी आपल्या एक्स अकाऊंटवरुन रोहित पवारांनी जप्तीत सापडलेल्या नोटांचा व्हिडीओ पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला," असंही राऊत यांनी म्हटलं आहे. "विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ओके करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे," असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. "कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं," असा टोला पोस्टच्या शेवटी रोहित पवारांनी लगावला आहे.
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?
लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून… pic.twitter.com/B9Z4gbqRk7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 22, 2024
दरम्यान, रोहित पवारांपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनीही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा उल्लेख करत या रोख रक्कमेवरुन गंभीर आरोप केला आहे.
"पुण्यातील खेड-शिवापूर टोलानाक्यावर काल दोन गाड्या होत्या. त्यामध्ये एकूण 15 कोटी होते. मी 8 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंच्या आमदारांना आणि इतर काही लोकांना 50 कोटींपेक्षा अधिक रक्कम पोहचवण्याची तयारी झाली आहे. 15-15 कोटींची पहिली इन्स्टॉलमेंट पाठवली जात आहे. आचारसंहिता लागली त्या रात्रीच ही तयारी झाली. मोठी रक्कम अनेक ठिकाणी पोहचवण्यात आली. सांगोल्यातील गद्दार आमदाराचे 15 कोटी जात होते. त्याच आमदाराचे लोक गाडीमध्ये होते. एक फोन आला त्या गाड्या सोडल्या," असं संजय राऊत म्हणाले. "एक इन्पेक्टर त्या आमदाराने त्याच्या गावात सेवेसाठी ठेवला होता. तो तिथे पोहचला आणि त्याने एक गाडी सोडवली. पण आमच्या लोकांनी एका गाडी पकडून दिली. राज्यात 150 आमदार आहेत ज्यांना 15 कोटी पोहचले आहेत. हे एक उदाहरण आहे की मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून कशाप्राकारे पैशांचं वाटप केलं जात आहे," असं राऊत म्हणाले. राऊत यांनी 150 आमदारांना प्रत्येकी 15 कोटी म्हणजेच 225 कोटींचं वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे.