Sanjay Raut Mention Timing Of CM Announcement: विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने राज्याच्या जनतेचा कौल राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असं असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हे एक्झिट पोल फेटाळू लावले आहे. महाविकास आघाडीला बहुमत मिळेल आणि आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करु असा दावा केला आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबद्दल कधी आणि किती वाजता घोषणा सांगणार आहोत हे सुद्धा राऊतांनी सांगितलं आहे.
मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी, "23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करु शकतो. महाविकास आघाडीच्या एकत्रित 160 ते 165 जागा निवडून येत आहेत. त्यामुळे एक्झिट पोलवर कोणी विश्वास ठेऊ नये. हे भाजपा आणि मिंधे गटाचं मोठं षड्यंत्र आहे. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा संशोधनचा विषय आहे," असा टोला लगावला आहे.
पत्रकारांनी जास्त मतदान झालं म्हणजे भाजपाला झालं, महायुतीला झालं असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. सत्तेच्या चाव्या आमच्या हाती येतील असा सत्ताधाऱ्यांचा दावा असल्यावरुन प्रश्न विचारला. संजय राऊत यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, "सत्तेच्या चाव्या येतील की कुलूप येतंय, हे आता परवा 72 तासांनी ठरेल. प्रचंड पैसे त्यांनी वाटलेत. पैशांचा पाऊस पडला आहे. यंत्रणांचा गैरवापर केला आहे. त्यानंतरही ही निवडणूक पैशांपेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढलेली निवडणूक आहे. आम्हाला खात्री आहे जनतेनं पैशांच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी मतदान केलं. आमचं स्पष्ट मत होतं. महाराष्ट्र हवा आहे की अदानी राष्ट्र हवंय?" असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंच्या पदरी निराशाच? 'मनसे'ला किती जागा मिळणार पाहिलं?
तसेच पुढे बोलताना संजय राऊतांनी, "आजच अमेरिकेत अदानींविरोधात अरेस्ट वॉरंट निघालं आहे. आम्ही सांगतो ना अदानींने महाराष्ट्र विकायला काढला आहे. सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनाने अदानीविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. टेंडर मिळवण्यासाठी 350 मिलियनची लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात धारावी, विमानतळ आणि इतर अनेक महत्त्वाची टेंडर आहेत. यामध्ये गौतम अदानींनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदींशी संगनमत करुन या सगळ्या जागा आणि टेंडर बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करु या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा टाकण्यात आला आहे," असा आरोप केला आहे.
नक्की वाचा >> रितेशचं भाकित! किती जागा जिंकणार? म्हणाला, 'माझ्या कॅलक्युलेशननुसार..'
महाविकास आघाडीचं सरकार येणार तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याचा वेळच जाहीर केला. "मी तुम्हाला सांगितलं आहे 23 तारखेला, 10.30-11 वाजता सांगेन कोण होणार मुख्यमंत्री," असं राऊत म्हणाले.