Supriya Sule Slams Ajit Pawar Candidate: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी चूरस दिसून येत आहे. यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे पुण्यातील वडगावशेरी! या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरेना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने बापू पठारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. काही महिन्यांपूर्वी याच मतदारसंघातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कारच्या अपघाताशी आमदार सुनील टिंगरेंचं नाव जोडलं जात आहे. या प्रकरणामध्ये त्यांची पोलीस चौकशीही झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी सभेत उघडपणे टीका करत टिंगरेंचा उल्लेख 'दिवटा आमदार' असा केला होता. मात्र आता यावरुनच शरद पवारांना नोटीस पाठवण्याचा इशारा टिंगरेंनी दिल्यानंतर या इशाऱ्यावर शरद पवारांच्या कन्या तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे.
'कल्याणी नगरच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन,' अशी नोटीस आमदार सुनील टिंगरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवली आहे. या नोटिशीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टिंगरेंना टोला लगावला. येरवडा इथं वडगावशेरी मतदारसंघाचे उमेदवार बापू पठारे यांच्यासाठी शुक्रवारी महाविकास आघाडीआची सभा पार पडली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून जोरदार टीका केली. "ज्या शरद पवारांनी मागील निवडणुकीत एबी फॉर्मवर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच आज पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे. हिम्मत असेल तर त्यांना न्यायालयात खेचूनच दाखवा. शरद पवार हे ईडीच्या नोटिशीला घाबरले नाहीत, तर तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?" अशा शब्दांत सुप्रिया सुळेंना टिंगरेंना टोला लगावला.
"पोर्शे अपघात प्रकरणी पोलीस ठाण्यात कुठल्या मोठ्या नेत्याचा फोन आला? हा आरोप आम्ही सगळ्यांनी केला होता. बापू तुम्ही मला शब्द द्या, कुठलाही अपघात झाला तर तुम्ही पोलीस ठाण्यात नाही तर पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जाल," असंही सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्याकडे पाहत म्हटलं. "मी आता पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. 'पोर्शे'तील गुन्हेगारांच्या मागे तुम्हीच होता," असा घणाघात ही सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका करताना केला.
येरवडा, पुणे 08-11-2024
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेतून लाईव्ह https://t.co/nji7rErAR2
— Supriya Sule (@supriya_sule) November 8, 2024
नक्की वाचा >> '...याचा अर्थ XX समजू नये'; 'भिकार संपादक' उल्लेख करत राऊतांवर संतापले राज ठाकरे
ऑक्टोबर महिन्यामध्ये वडगावशेरीमध्ये टिंगरे यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यावर 'दमदार आमदार' असा उल्लेख होता. त्यावरून शरद पवार यांनी पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीला मदत व्हावी, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दबाव टाकणारा ‘दिवटा आमदार’ अशा शब्दांत टिंगरेंवर टीका केली होती. या भागातील मतदार तुझा बंदोबस्त करतील, अशी टीका केली होती. गुन्हेगारांना मदत करणारा हा दमदार आमदार असेही शरद पवार म्हणाले होते. यानंतर एका आठवड्याने झालेल्या एका सभेत शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या प्रकल्पांची यादी वाचून दाखवित टिंगरे यांच्या कामाचे विशेष कौतुक केलं होतं. पोर्शे प्रकरणामुळे टिंगरेंना उमेदवारी मिळणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती मात्र अजित पवारांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखला आहे.