धनंजय मुंडेंच्या पत्नीने सांगितले विजयामागचे गुपीत

पंकजा मुंडेंना आपला विधानसभा मतदारसंघही राखता आला नाही. 

Updated: Oct 25, 2019, 06:57 PM IST
धनंजय मुंडेंच्या पत्नीने सांगितले विजयामागचे गुपीत title=

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. भावा बहिणीच्या या संघर्षाकडे तमाम राज्याचं लक्ष लागलं होतं... भाजपाच्या वरच्या फळीतल्या महिला नेत्या आणि 'महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री' अशी त्यांची वर्णनंही त्यांच्या गटातून गायली जात होती. परंतु, पंकजा मुंडेंना आपला विधानसभा मतदारसंघही राखता आला नाही. 

यासर्वात धनंजय मुंडे यांच्या पाठीशी परळीकर ठामपणे उभा राहीला. मतदानाच्या आधी धनंजय यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात पसरला होता.  त्यानंतर पंकजा यांना आलेली भोवळ ही देखील चर्चेत राहीली. पंकजा यांनी देखील धनंजय यांच्यावर टीका केली. या सर्वात धनंजय मुंडे यांना खूप मानसिक त्रास झाला. अगदी निकालाच्या दिवशीही तो दिसून येत होता. पण धनंजय मुंडे यांच्या विजयानंतर कार्यकर्ते उत्साहात आहेत. त्यांचे कुटुंबही आनंदात आहे. त्यांची पत्नी राजश्री मुंडे यांनी देखील यासाठी विशेष मेहनत घेतली होती. धनंजय मुंडे यांच्या विजयाचे गुपित त्यांनी 'झी २४ तास'ला सांगितले आहे. 

धनंजय यांचा हा ऐतिहासिक विजय असून किती आनंद झाला तो शब्दात सांगता येणार नाही असे त्यांनी म्हटले. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती म्हणून हा जनतेचा विजय असल्याचे त्या म्हणाल्या. दीड लाख बहिणी साहेबांच्या मागे होत्या त्यामुळे हा विजय झाल्याचे त्यांनी म्हटले. 

त्यांच्या विजयामागे संपूर्ण कुटुंब, संपूर्ण मतदारसंघ उभा होता त्यामुळे कसरत अशी काही झाली नाही. रोज सहा गाव आम्ही करायचो. सकाळी दोन गाव आणि संध्याकाळी चार गाव करायचो. माणसं भेटायला यायचे. ज्यांचे प्रश्न तात्काळ सोडवता येतील त्या तिथेच सोडवल्या. ज्या सोडवण्यात वेळ लागणार होता त्याची ग्वाही आम्ही त्यांना दिल्याचे त्या म्हणाल्या.  जनतेसाठी २४ तास झटणाऱ्या व्यक्तीला परळीच्या जनतेने निवडून दिल्याचा आन्ंद त्यांनी व्यक्त केला.