अहमदनगरमध्ये मिरवणुकीत झळकला औरंगजेबाचा फोटो; Video सोशल मीडियावर व्हायरल

Aurangzebs Posters In Rally: मिरवणुकीत चक्क औरंगजेबाचे छायाचित्र झळकवल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Updated: Jun 5, 2023, 06:29 PM IST
अहमदनगरमध्ये मिरवणुकीत झळकला औरंगजेबाचा फोटो; Video सोशल मीडियावर व्हायरल  title=
Maharashtra Aurangzeb s posters in AIMIM rally in ahmednagar

लैलेश बारगजे, झी मीडिया, 

Aurangzebs Posters In Rally: अहमदनगर (Ahmednagar) शहरातील फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरुस निमित्त मुकुंदनगर परिसरातुन चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान या मिरवणुकीत चक्क औरंगजेब (Aurangzeb) याचा फोटो घेऊन काही जण नाचत असल्याचा प्रकार घडला आहे.

विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIMच्या आंदोलनावेळी असाच प्रकार घडल्याने वातावरण बिघडले होते. दरम्यान आता देखील अहमदनगरमध्ये काही तरुण औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुकुंदनगर परिसरात सूफी संत दमबारा हजारी यांचा दर्गाह आहे. रविवारी या दर्ग्याचा उरुस म्हणजे जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी डीजे लावून मिरवणुक काढण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर येथील उरूस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या चौघांचा शोधदेखील पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये शहरातील फकीरवाडा परिसरात दमबारा हजारी दर्ग्याचा सदंल उरुस साजरा करत असताना काही तरुण डीजेच्या तालावर नाचत औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है, अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन द्वेष पसरेल असे कृत्य केल्याच्या आरोपावरून मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख, शेख सरवर आणि जावेद शेख या तरुणांवर भिंगार पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी. 505 (2), 298, 34 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वतः पोलीस या ठिकाणी फिर्यादी झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे, तर या प्रकारामुळे शहरामधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल. तर हे मान्य केले जाणार नाही. या देशांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू शकतात. कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी माफी नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

वाशिममध्येही घटला होता असाच प्रकार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातही बॅनरवर औरंगजेबाचे छायाचित्र, बॅनरवर लावण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्यानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता.