मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे. रुग्णवाढ कायम राहिल्यास दहावी, बारावीच्या परीक्षांवरही संकट येणार असल्याचं स्पष्ट होतंय. 10वी, 12वीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत विचार केला जाईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांचे यांनी दिली आहे.
राज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांनी दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट उभे केले आहे. रुग्णवाढीचा आलेख असाच राहिल्यास दोन दिवसांआधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकावर संकट उद्भवण्याची भीती शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, करोनामुळे पुन्हा परीक्षा पद्धतीमध्ये किंवा वेळापत्रकात बदल झाल्यास कमी मनुष्यबळावर काम करणाऱ्या शिक्षण मंडळालाही नियोजनासाठी कसरत करावी लागणार आहे. या सगळ्या परिस्थितीवर राज्यात ऑनलाईन परीक्षा घ्यायची की नाही यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (State Corona Count increased) डोकं वर केलं आहे. राज्यात 6 हजार 281 नवे कोरोना रूग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या मुंबईत 897 बाधित रुग्ण सापडले आहेत. दिवसागणिक रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. नियमांचं पालन न केल्यास नाईट कर्फ्यूचा विचार केला जाईल असा इशारा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
भारतात कोरोनाचे 7 हजार 569 म्युटेशन्स अस्तित्त्वात असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी हे विश्लेषण केलं आहे. भारतातील कोरोना घातक नसल्याचाही दावा संशोधकांनी केला आहे. राज्यात कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यात ६ हजार २८१ नवे कोरोना रूग्ण तर कोरोनामुळं ४० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे ४८ हजार ४३९ ऍक्टिव्ह रूग्ण आहेत.