Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात सरकार जरी स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळ आणि खातेवाटप अद्याप जाहीर करण्यात आले नाहीये. शपथविधीनंतरही महायुतीच्या खातेवाटपाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याने दोन्ही नेत्यामध्ये तासभर चर्चा झाल्याचे समजतंय. या बैठकीत शिवसेनेला किती खाती मिळणार याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.
वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्री पदाबाबत निर्णय झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तसंच, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचे समजतेय. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पजली. खासदार प्रफुल पटेल यांच्या सीजे हाऊस येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात १ तास बैठक झाली. यावेळी बैठकीत 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 व 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती. मात्र, मंत्र्यांच्या नावांची निवड, तीनही नेत्यांची नावांवर चर्चा आणि मग केंद्रातून मंजुरी या प्रकियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. तसंच, आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं एका दिवसात ही सर्व प्रक्रिया कठिण आहे. त्यामुळं 11-12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे धुसरलं असल्याचे बोललं जात आहे.