Ahmednagar Name Change: अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी होळकर असे केला जाणार आहे. अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने चौंडी येथे कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचं नामांतराची घोषणा केली.
औरंगाबाद, उस्मानाबादपाठोपाठ आता अहमदनगरचंही नामांतर होणार आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अहमदनगरमधूनच त्यांनी हे जाहीर केले. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करा अशी मागणी धनगर समाजाने केली होती.
अहिल्यादेवी होळकरांच्या 298वी जयंती कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. अहिल्यादेवींचं जन्मगाव असलेल्या अहमदनगरच्या चौंडीत, होळकरांच्या वंशजांच्या उपस्थितीत जयंती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पगडी, काठी, घोंगडं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर झाल्यानंतर आता अहमदनगर शहराचं नामांतर होण्याची चर्चा रंगली होती. अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर होणार असं ट्विट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात नामांतर होणारच असं पडळकरांनी म्हटले होते. तर, नगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी लोकांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिला होती.
धाराशिवनंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला ब्रेक
धाराशिवनंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरालाही ब्रेक लागला आहे. जोवर नामांतराची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर नामांतर करू नये अशी सूचना मुंबई हायकोर्टानं दिलीय. नामंतराविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं तुर्तास औरंगाबादचं नाव बदलू नये असं म्हंटलंय. या प्रकरणावर पुढील सुनावणी 7 जूनला होणार आहे.