प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न', तर निवडणूक लढवली असती

तरडे यांना महाआघाडीकडून विचारणा 

Updated: Oct 21, 2019, 01:13 PM IST
प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न', तर निवडणूक लढवली असती

मुंबई : 'मुळशी पॅटर्न' सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी आज (21 ऑक्टोबर) पुण्यात विधानसभेकरता मतदान केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आणि सगळ्याच मतदारांना मतदान करण्याच आवाहन देखील केलं आहे. 

प्रवीण तरडे यावेळी म्हणाले की,' मला कोथरूड मधून उमेदवारी साठी माझ्या नावाची चर्चा होती, पण मला मुळशीतून उमेदवारी मिळाली असती तर नक्कीच विचार केला असता. तसेच मी कोथरूडमध्ये मतदार म्हणून पुन्हा पुन्हा येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 

त्याचप्रमाणे प्रवीण तरडे पुढे म्हणाले की,'आज आपण बोट काळं केल तरच उद्या दुसऱ्याकडे बोट दाखवू शकणार आहोत, म्हणून मतदान करा'. पुढे त्यांनी मुंडे कुटुंबातील वादावर म्हटलं की,'राजकारणात नाती तुटायला नको, भाऊबीज 4 दिवसांवर आली असताना परळीमध्ये जे घडलं ते अतिशय वाईट आहे'

प्रवीण तरडे यांना विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार पदासाठी विचारण्यात आले होते. कोथरूडमधून त्यांच्या नावाची चर्चा होती. तसेच महाआघाडीने त्यांना चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उभे राहणार का? असे देखील विचारले होते. प्रविण तरडे यांना महाआघाडी आणि इतर पक्षाकडून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी अनेकदा विचारण्यात आलं. प्रवीण तरडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उभे राहिले नाहीत.