'या' मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट, एक टक्काही मतदान नाही

वाढवण-वरोरमध्ये मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट

Updated: Oct 21, 2019, 11:56 AM IST
'या' मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट, एक टक्काही मतदान नाही title=

डहाणू : महाराष्ट्रातल्या राजकिय प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. विधानसभा निवडणूक २०१९ साठी मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ५ टक्के तर ११ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. एकंदरीत सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये मतदानाबाबत निरुत्साह दिसतोय. तरुण वर्ग दुपारनंतर बाहेर पडून मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान वाढवण-वरोरमध्ये मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दोन तासात एकही टक्का मतदान नाही.

पालघरच्या किनारपट्टी भागातील वाढवण,वरोरसह डहाणू खाडी आणि इतर परिसरातील जनतेचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकण्यात आला आहे.

यंत्रणा सज्ज 

राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच १ लाख ३५ हजार व्ही व्ही पॅट यंत्रांची सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सुविधा पुरवण्यात आली आहे. तर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आणि तीन लाख पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.

झी २४ तासचं आवाहन 

मतदान हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा अधिकार जरुर बजावावा असं आवाहन, झी २४ तास सर्वांना करत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदानकेंद्रावर ओळख पटवण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसल्यास ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे सांगितले आहे. पाऊस कितीही असला तरीही आपण मतदान कराच; झी २४ तासचं सगळ्या मतदारांना आवाहन...