मुंबई : कोरोनासारख्या (Coronavirus) महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Corporation employees) कुटुंबीयांना मोठा दिलासा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रgपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही 30 जून 2021 पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहrर केले.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरुदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटीने 74 व्या वर्षात पदार्पण केले. ग्रामीण तसेच शहरी भागातील चाकरमान्यांच्या हृदयात कायम स्थान असलेल्या एसटीचा मंगळवारी, 1 जून 2021 रोजी 73 वा वर्धापनदिन पार पडला. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले कोरोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
एसटीच्या वर्धापदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतानाच मंत्री, ॲड. अनिल परब यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या महामारीत एसटी महामंडळाच्या कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दुरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील महामंडळाच्या विविध अधिकाऱ्यांशी बोलताना मंत्री, अॅड. परब यांनी कामगारवर्गाला मोठा दिलासा देत आश्वस्त केले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत 30 डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर 30 जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत मंत्री, ॲड. परब यांनी हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील 30 जून 2021 पर्यंत वाढविला असल्याचे घोषित केले.
दरम्यान, कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाख रूपयांची मदत देण्याचे ॲड. परब यांनी जाहीर केले.
कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे सांगतानाच महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात अॅड. परब यांनी कामगारांना आश्वस्त केले.