राज्य सरकारची विधानसभेत मोठी घोषणा, 7 हजार 231 पदांची पोलीस भरती

 Police Recruitment News : पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5  हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात  7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे.

Updated: Mar 15, 2022, 01:42 PM IST
राज्य सरकारची विधानसभेत मोठी घोषणा, 7 हजार 231 पदांची पोलीस भरती title=

मुंबई : Police Recruitment News : पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5  हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात  7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली. (Maharashtra Government's big announcement in the Legislative Assembly, recruitment of seven thousand two hundred and thirty one police posts)

पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींच्या सुधारणा करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 87 पोलीस ठाण्यांची बांधकामे हाती घेतली आहे. यावर्षी पोलिसांच्या निवासस्थानांसाठी देखील भरीव तरतूद केली आहे, असेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदारांना पोलीस दलात जाण्याची संधी उपलब्ध आहे, त्यासाठी 15 वर्षांची अट होती ती आता12  वर्षांवर केल्याचे सांगून कोविडकाळात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक करुन 394 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.

138 विशेष जलदगती न्यायालये सुरु करण्यास मान्यता

बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) अंतर्गत दाखल गुन्ह्यांसाठी 138 विशेष जलदगती न्यायालये सुरु करण्यास मान्यता दिली आहे, हे सांगतानाच, गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षभरात 120 ते 150 दिवस काम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याचेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

7 हजार 231 पदांची नवीन पोलीस भरती  

पोलीस भरती 2019  मधील रिक्त असलेल्या 5  हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात यातील पात्र निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका दिल्या जातील असे सांगून येत्या काही दिवसात 7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे, मंत्रीमंडळाने या भरतीला मान्यता दिली आहे. कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

पोलीस शिपायाला कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय 

पोलीस सेवेत शिपाई म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यास निवृत्त होताना 30 वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकपदी कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस शिपायांना आता निवृत्तीच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असेही वळसे-पाटील यांनी सांगितले.  

लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांच्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.  कोविड काळात शासनाने घातलेल्या नियमांचा भंग केला म्हणून दाखल गुन्हे मागे घेण्याचा तत्वतः निर्णय घेतला असून पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांकडून प्राप्त प्रस्तावांनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

पेपरफुटीप्रकरणात पोलिसांची कठोर भूमिका

पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून विविध 5 गुन्हे दाखल केले आहेत. आरोग्य विभागाच्या 'ड' वर्ग भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रक्रणी 20 जण अटकेत आहेत. 10 जणांना अटक करणे बाकी आहे. आरोग्य विभागाच्याच 'क' वर्ग भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणी 11 जणांना अटक केली असून 9 जण पोलीसांना हवे आहेत तर म्हाडातील पेपरफुटी प्रकरणी 6 अटकेत आहेत. टीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरु असून 14 जणांना अटक केली आहे, असे सांगून भरती प्रक्रियेसाठी कंपन्या नियुक्त करताना यापुढे पारदर्शक पद्धती राबविण्यावर विविध विभागांना भर द्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.