PKL 11: अर्जुन देशवालच्या खोलवर चढाया आणि त्याला बचावात अंकुश राठी, रेझा मिरबाघेरीकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे जयपूर पिंक पॅंथर्सने पुणेरी पलटण संघावर ३७-२३ असा १४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. जयपूरच्या खेळाडूंना सामन्याला दिलेला वेग आणि पुणेरी पलटणला सातत्य राखण्यात आलेले अपयश असेच या सामन्याच्या निकाल दर्शवतो. या विजयासह जयपूर पिंक पॅंथर्स संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला.
अर्जुन देशवालच्या खोलवर आणि चतुरस्त्र चढायांच्या जोरावर जयपूरचा विजय खऱ्या अर्थाने साकार झाला. केवळ अर्जुनच त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता. त्याने १६ गुणांची कमाई केली. त्याला रेझा आणि अंकुश राठी यांनी प्रत्येक चार गुण मिळवून दिलेली साथ निर्णायक ठरली. पलटणच्या चढाईपटूंना लय गवसली नाही. मोहित गोयत आणि पंकज मोहितेचे प्रत्येकी ७ गुण वगळता त्यांच्याकडून कुणालाच छाप पाडता आली नाबही. आकाश शिंदेला तर गुणाचे खातेही उघडता आले नाही. अर्जुनच्या चढायांनी दडपणाखाली पलटणचा बचाव इतका निष्प्रभ ठरला की त्यांना संपूर्ण सामन्यात केवळ ३ गुण मिळवता आले. चढाईत त्यांनी १९ गुणांची कमाई केली.
मध्यंतरानंतर जयपूर पिंक पॅंथर्स संघाने खेळाला अधिक वेग दिला. अर्थातच यात प्रमुख वाटा अर्जुनच्या खोलवर चढायांचा राहिला होता. एकवेळ पुणेरी पलटणचे तीन खेळाडू आत असताना अर्जुनच्या खोलवर चढाईवर प्रथम अविनेश नंदराजन स्वयंचित झाला. त्याच प्रयत्नात गौरवची घाई महागात पडली आणि त्या वेळी तिसऱ्या खेळाडूचा गाफिलपणा पलटणला महागात पडला. निवांत फिरणाऱ्या पलटणच्या व्ही. अजित कुमारलाही बाद करुन अर्जुने हंगामात सहाव्यांदा सुपर टेन साजरे करताना पलटणवर दुसरा लोण चढवला. यामुळे जयपूरची आघाडी २५-११ अशी भक्कम झाली होती. त्यानंतरही सातत्याने अर्जुनच्या चढायांनी जयपूरचे गुण वाढतच राहिले. उत्तरार्धातील पहिलवी दहा मिनिटे संपली तेव्हा जयपूरची स्थिती ३२-१६ अशी भक्कम होती. अर्जुनला आज रेझाकडून बचावात पूरक साथ मिळाली. अखेरच्या सत्रात पलटणने प्रयत्न केले असले, तरी त्यात जोश आणि आवेश नव्हता. पिछाडीतील फरक मोठा होता. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. जयपूरच्या चढाईपटूंनी वेळकाढू चढाया करत अखेरची मिनिट खेळून काढली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
पूर्वार्धातील संथ सुरुवातीनंतर जयपूर पिंक पॅंथर्स संघाला नीरज नरवालच्या चढायांनी प्रेरणा दिली. त्याच्या चढायांतील गुणांबरोबर बचावफळीत रेझा मिरबाघेरीने सुरेख साथ केली. बरोबरीत चाललेल्या सामन्यात मध्यंतराला चार मिनिटे शिल्लक असताना जयपूरने पुणेरी पलटण संघावर लोण चढवत आघाडीत मुसंडी मारली. लोण बसल्यानंतर पलटण संघ दडपणाचा सामना करु शकला नाही. त्यांच्या चढाईपटूंना फारशी चमक दाखवता आली नाही आणि त्यांची बचावफळी देखिल पूर्वार्धातील अखेरच्या टप्प्यात अर्जुन देशवालच्या खोलवर चढाईने निष्प्रभ ठरली. मध्यंतरापर्यंत पलटणला चढाईत ९ गुण मिळवता आले. पण, बचावात त्यांची मजल केवळ दोन गुणांपर्यंत राहिली. तुलनेत जयपूरने चढाईत १२ आणि बचावात ५ गुणांची कमाई करताना मध्यंतराला १९-११ अशी सात गुणांची मोठी आघाडी मिळवली.