रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील तांबडी बुद्रुक येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश.

Updated: Aug 14, 2020, 09:41 AM IST
रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील तांबडी बुद्रुक येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकारी यांना गृहराज्यमंत्री  (ग्रामीण ) शंभूराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत  देसाई बोलत होते.

 तांबडी बुद्रुक येथील घटनेचा तपास नि:पक्षपातीपणे करावा,  तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषींवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबतही शासन स्तरावर विचार केला जाईल असे देसाई यावेळी म्हणाले.

 या घटनेच्या चौकशीबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरेआणि महेश राणे यांनी दिले. दरम्यान,  तांबडी येथील बलात्कार आणि खून प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. ही २६ जुलै २०२० रोजीची घटना आहे.