मेघा कुचिक, झी मीडिया, पुणे : पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत आज रंगणार आहे.
अभिजित गादी विभागात विजयी ठरला, तर माती विभागात किरणने बाजी मारली. आज संध्याकाळी पुण्यातील भूगाव इथं ही प्रतिष्ठित लढत रंगणार आहे. विजय चौधरी यंदा स्पर्धेत सहभागी न झाल्यानं यंदा महाराष्ट्र केसरीला नवा विजेता लाभणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आज रंगणार आहे. पुण्यातील अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत मल्ला ही मानाची लढत होतीये. पुण्याचा अभिजीत कटके हा अमर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीत सराव करतो. अतिशय कमी वयात कुस्तीमध्ये त्याने उत्तम पकड मिळविलीये. कटके घराण्यामध्ये पैलवानकीची परंपरा असून अभिजीतच्या रुपाने पाचवी पिढी कुस्तीमध्ये आहे. आर्मी स्पोर्टस् मध्ये देखील तो सराव करतो. अभिजित हा राष्ट्रीय खेळाडू असून सेमी फायनलमधे त्यानं गादी विभागात सहज विजय मिळवला.
तर किरण भगत हा जरी साताराचा असला तरी तो पुण्यात काका पवार यांच्या कुस्ती संकुलात सराव करतो. सांगली सातारा इथल्या अनेक केसरी स्पर्धा त्यानं जिंकल्या आहेत. चितपट कुस्तीसाठी तो प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत अभिजित कटकेनं सलग दुसऱ्यांदा धडक मारलीये. तर किरण भगत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करू शकलाय. अभिजित गादी तर किरण माती विभागात प्रवीण आहे. आतापर्यंतची कामगिरी पाहता अभिजीतच पारडं जड वाटत आहे. मात्र किरणचा डावही निकाल पालटवू शकतो.