पुण्यानंतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कोल्हापूर, स्वातंत्रदिनाआधी एनआयएची छापेमारी

स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर एनआयएनं कोल्हापूर आणि नाशिकमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केलीय.. एनआयएनं शनिवारी कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत छापेमारी करत तीन संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीय. 

प्रताप नाईक | Updated: Aug 14, 2023, 08:10 PM IST
पुण्यानंतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कोल्हापूर, स्वातंत्रदिनाआधी एनआयएची छापेमारी title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : स्वतंत्र दिनाच्या तोंडावर एनआयएने (NIA) कोल्हापूर (Kolhapur) आणि नाशिक (Nashik) येथे 14 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. एनआयएने (NIA) 13 ऑगस्ट रोजी कोल्हापुर, इचकरंजी, हुपरी इथं छापेमारी करत तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचाही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच संशय व्यक्त केला जात असून त्यांच्याकडून महत्वाचे पुरावे देखील जप्त करण्यात आल्याचे कळतय . एनआयएने ही कारवाई करताना अतिशय गुप्तता बाळगली असून याबाबतची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील माहित नसल्याचे समोर आले आहे. या करवाईमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे

दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे येथून दहशतवादी असल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली होती. यानंतर त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी आंबोली आणि चांदोली इथल्या जंगलात स्फोटकांची चाचणी घेतली असल्याचं निष्पन्न झालं होते. त्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी निपाणी, संगमेश्वर, आंबोली, चांदोली या परिसरात तपासणी करून संशयितांचा निवास कोठे होता, याचा शोध घेतला होता. हे दोघे संशयित पीएफआयशी संबंधित असल्याची शक्यता असल्याने, त्या अनुषंगाने 'एनआयए'ने स्वतंत्र तपास सुरू केला.

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात यश आला असून याच अनुषंगाने NIA ने पुढे तपास सुरू ठेवला आहे.  शनिवारी एकाच वेळी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमधील 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी इथं देखील छापेमारी करण्यात आली. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना कोल्हापूर पोलिसांना कोणातीच कल्पना देण्यात आली नाही

शनिवारी कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी इथही छापेमारी करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी दोघे 30 ते 35 वयोगटातील आहेत .तर एक व्यक्ती 45 वर्षांचा असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्याकडून छापेमारीत महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या आहेत. एनआयएने तिघांकडून संशयास्पद कागदपत्रं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लोखंडी शस्त्रे जप्त केल्याचं सांगितलं जात असून ही कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आली आहे. एनआयएने याआधीही काही लोकांची चौकशी केली. या तिघांचाही पीएफआय या दहशतवादी संघटनेशी नियमित संपर्क असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आल्याने त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात मॉक ड्रिल घेतलं.  अंबाबाई मंदिर परिसरात देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकानी दिल्या आहेत. 

स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधीच एनआयएने केलेल्या कारवाईने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी दीड ते दोन वर्षांपूर्वी ही एनआयएने कोल्हापुरातील सुभाषनगर परिसरात छापेमारी केली होती. त्यावेळी एका संशयिताला एनआयएने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तीन जणाना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पुण्यात पकडलेल्या दहशतवादांकडून कोल्हापूरच्या परिसरात केलेल वास्तव्य, बॉम्ब चाचणी आणि आत्ता 'एनआयए'कडून करण्यात आलेली कारवाई त्यामुळे कोल्हापूर देखील दहशतवाद्याच्या हिटलिस्टवर असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळेच कोल्हापूर पोलिसांनी आपल्या आजूबाजूला संशयित कोणतीही वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क करावा असा आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.