Ajit Pawar And Sharad Pawar Meet : शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले आहे. काका-पुतण्यांमधल्या या भेटीगाठींवर शिवसेना ठाकरे गटानं कडाडून टीका केली आहे. भीष्म पितामहांकडून हे वर्तन अपेक्षित नाही, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा आशीर्वाद असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरूच आहे. गेल्या शनिवारी काका-पुतण्यांच्या झालेल्या गुप्त भेटीमुळं या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. पवार काका-पुतण्यांच्या भेटीमुळं महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून थेट शरद पवारांवरच टीकेची तोफ डागण्यात आली आहे.
अजित पवार वारंवार शरद पवारांच्या भेटीस जातात. शरद पवार या भेटी टाळत नाहीत, हे गमतीचे आहे. त्यामुळं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. शरद पवारांची प्रतिमा अशा भेटीनं मलिन होते, ते बरं नाही. महाराष्ट्र म्हणजे गंमत जंमत नाही, अशा शब्दांत सामनातून टीकास्त्र सोडण्यात आलं.
एरवी शरद पवारांची बाजू उचलून धरणा-या राऊतांनीही यावेळी पवारांवर टीका केलीय. लोकांच्या मनात संभ्रम, संशय निर्माण होईल, असं भीष्म पितामहांनी तरी वागू नये, असं संजय राऊतांनी ठणकावलं.
महाविकास आघाडीच नव्हे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील पवारांच्या भेटीगाठींवरून पुन्हा एकदा चिमटा काढला.
राष्ट्रवादीची एक टीम आधीच गेलीय, दुसरीही लवकरच जाईल या विधानाचा पुनरूच्चार राज ठाकरेंनी केला. हे सगळे एकमेकांना आतून मिळालेत असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीत कसलाही संभ्रम नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. भाजपशी संबंधित असलेल्यांशी आमचा काहीही संबंध असणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नसून एक दिसणारा गट आहे आणि एक न दिसणारा गट आहे. शरद पवारही अजित पवारांसोबत महायुती मजबूत करतील असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय. अजितदादा बाहेर पडल्यानंतर जो विरोध व्हायला पाहिजे होता तो होताना दिसला नाही, शरद पवार यांचं बोलणं आणि प्रत्यक्षात त्यांची कृती हे न समजण्यासारखं आहे. पवार जे बोलतात ते कधीच करत नाही आणि जे करतात ते कधीच बोलत नाहीत अशी टीकाही कडूंनी केली आहे.
चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी शरद पवारांचीच
मात्र पवारांनी वारंवार खुलासे केले तरी राजकीय चर्चा काही थांबायला तयार नाहीत. आता तर महाविकास आघाडीतले नेतेही उघडपणं नाराजी व्यक्त करू लागलेत. त्यामुळं भीष्म पितामहांची दुहेरी कोंडी झालीय. हा चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी शरद पवारांचीच असणार आहे.