यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा

देशाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होईल. पण या 76 वर्षात आदिवासी आणि गोरगरीब समाजाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का?  अलिशान वैभव सोडा, सध्या मुलभूत सुविधा तरी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का?  

Updated: Aug 14, 2023, 06:32 PM IST
यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा  title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : राज्यात 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन (Tribal Day) साजरा करण्यात आला. तसंच देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाले असून अनेक क्षेत्रात भारताने उंच भरारी घेतली आहे. पण दुर्देवाने राज्यातील आदिवासी समाज आजही मरण यातना भोगतोय. आदिवासी समाज, तळागाळातील गोरगरीबांसाठी अनेक योजना जाहीर होत असतात. पण या योजनांचा लाभ नेमका कोणाला होतो असा प्रश्न उपस्थित होता. कारण हा समाज आजही आरोग्य, रस्ते, वीज या मुलभूत समस्यांपासून कोसो दूर आहे. 

देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होऊन गेला.  मात्र ग्रामीण तसंच आदिवासी पाड्यांवर अजूनही मुलभूत सुविधांसाठी (Basic Facilities) झगडावं लागतंय. आरोग्य सुविधा, वीज, रस्ते नसल्याने आतापर्यंत आदिवासी समाजातील अनेक महिला, वृद्ध नागरिकंना जीवाला मुकावं लागलं. अशीच पुन्हा एक दुर्देवी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडक-ओहळमध्ये समोर आली आहे. आदिवासी समाजातील एका ग्रामस्थाचा मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

साखळी करत नदीपात्रातून अंतयात्रा  
नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडकओहळ हा आदिवासी पाडा आहे. या पाड्यावरील ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी ओहोळ-नदी पार करून जावं लागतं. नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना मोठे काष्ठ करावे लागतात. याच पाड्यावरील एका ग्रामस्थाचं निधन झालं. त्याच्या अंत्यविधीसाठी नदीपार करून जाणे गरजेचे होते. मात्र सध्या पाउस सुरु असल्याने नदीची पाणीपातळी वाढली आहे. नदीला पूल नसल्याने जायचे कसे असा विचार सर्व ग्रामस्थांनी केला. पाणीपातळी अधिक वाढली तर मृतदेह अंत्यविधी न करता पूर ओसरेपर्यंत घरात सांभाळत बसावा लागेल. यासाठी ग्रामस्थांनी नदीपात्रातून मानवी साखळी मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला.

तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष 
खडकओहळ भागातील ग्रामस्थांनी रस्ता, पूल आणि इतर सुविधांबाबत तक्रार केली आहे. तक्रारीचे वारंवार पाठपुरावा सुद्धा केला. मात्र, अर्ज-विनंत्यांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तक्रारीची दखल घेतली असती तर आदिवासी ग्रामस्थांच्या मरणानंतरच्या यातना संपल्या असल्याच त्यांनी सांगितलं.  

गुजरातमध्ये समावेश करण्याची मागणी 
खडकओहळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या 1200 च्या दरम्यान आहे. खडकओहळजवळ  जांभुळपाडा, विराचा पाडा असे दोन पाडे आहेत. इथल्या ग्रामस्थांना दुसऱ्या पाड्यावर जाण्यासाठी ओहोळ-नदी ओलांडून जावे लागते. अंत्यविधीसाठी, गर्भवती महिलेस दवाखान्यात नेतांना, आजारपणात दवाखान्यात नेतांना तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याच ग्रामस्थांनी सांगितलं. या समस्यांबाबत ग्रामविकास विभागाकडे पत्र दिले. मात्र, अद्यापही इथल्या समस्यांकडे यंत्रणांचे लक्ष गेलेले नाही. गैरसोयीने बेजार ग्रामस्थांनी आमच्या ग्रामपंचायतीचा जवळच्याच गुजरात राज्यात समावेश करावा, अशी मागणी केली आहे.

आरोग्य सुविधा नसल्याने मृत्यू 
आदिवासी पाड्यांवर आरोग्य सुविधा नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच रस्ते नसल्याने महिलांच्या प्रसूती रस्त्यावर होऊन जन्मला येण्या अगोदर बालकांचा मृत्यू झाला असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x