मानवी कवटी, रुद्राक्षाची माळ...; अमावस्येच्या रात्री जळगावात सुरू होता अघोरी प्रकार, पोलिस येताच...

Jalgaon Crime News: जळगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुप्त धनासाठी अघोरी पूजा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Updated: Jul 17, 2023, 06:09 PM IST
मानवी कवटी, रुद्राक्षाची माळ...; अमावस्येच्या रात्री जळगावात सुरू होता अघोरी प्रकार, पोलिस येताच...  title=
Maharashtra nine booked for black magic for money in jalgaon

वाल्मिक जोशी, झी मीडिया

जळगावः आज सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2023) आहे. घराघरात दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख-शांती व सुख समृद्धी येते, अशी मान्यता आहे. मात्र, आजच्या अमावस्येच्या दिवशी जळगावात भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील पेट्रोल पंपासमोरील शेतातील पडीक घरात अमावास्येला अघोरी पुजा (Black Magic) करून गुप्तधनाचा शोध घेणाच्या प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी धाड टाकत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. (Jalgaon Crime News)

अघोरी कृत्य करुन गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात पोलीसांनी जळगाव जिल्ह्यातील व नाशिक येथील ९ जणांना ताब्यात घेतले असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील एका शेतातील पडीक घरात काही व्यक्ती अघोरी पुजा करत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून घरात छापा टाकला. तेव्हा घरात असलेल्या नऊ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  यात जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. 

अमावस्या असल्याने सर्व संशयित आरोपी गोलाकार स्थितीत खाली बसले होते. तर एका वर्तुळात मानवी खोपडी, लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळया धातुचा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुंर,आगरबत्ती पुडा, लोखंडी अडकीत्ता व कापुराची असे साहित्य ठेवून त्यांनी पूजा मांडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपीही गुप्तधनाकरीता आघोरी कृत्य करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून मोबाईल, कार आणि अघोरी पुजा करण्याचे साहित्य असा एकुण ८ लाख ३५ हजारांचा मु्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आशा कुठल्याही प्रकारच्या घटनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी दिली आहे.