महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भीषण चेहरा! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज

Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठी चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भरतीच्यानिमित्ताने विशेष तयारी करण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 18, 2024, 11:27 AM IST
महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भीषण चेहरा! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज title=
19 जूनपासून सुरु होणार मैदानी चाचण्या (फाइल फोटो, सौजन्य- पीटीआय)

Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्रातील राज्य पोलीस दलातील रिक्त पदांसाठी गृह विभागाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसहीत राज्यात वेगवेगळ्या विभागांमध्ये एकूण 17 हजार 471 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. मात्र या भरतीच्यानिमित्ताने राज्यातील बेरोजगारीची दाहकता समोर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस भरतीच्या 17 हजार पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. 19 जूनपासून उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई, बँडसमन या पदासाठी ही भरती होत आहे. 

दोन पदांसाठी अर्ज करण्याची मूभा पण...

राज्यातील पोलीस दलात हजारो पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत असल्याने गृह विभागाने 17 हजार 471 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांची तूट भरुन काढण्यासाठी 2022-23 मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. मात्र मार्च महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवणे शक्य झालं नव्हतं. निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर भरतीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांची मैदानी चाचणी 19 जूनपासून सुरू होत आहे. एक उमेदवार हा दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र तो दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळेच या भरतीमध्ये एकाच उमेदवाराने दोन पदांसाठी देखील अर्ज केले आहेत. दोन्ही पदांसाठी एकाच वेळी मैदानी चाचणी असल्यास अशा उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी अन्य वेळेत चाचणीला जाण्यास मुभा देण्यात येणार आहे.

पाऊस लक्षात घेता विशेष सुविधा

अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रत्येक जिह्यात मैदानी आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या दिवशी मैदानी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. पावसाचा अंदाज पाहून मैदानी परीक्षेची माहिती उमेदवारांना कळवण्यात येईल. मैदानी आणि लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था वेल्फेअर हॉलमध्ये करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना राहायची व्यवस्था नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता. इतर जिह्यांमधून मुंबईत भरतीसाठी येणाऱ्या हजारो उमेदवारांना रात्र रस्त्यावर काढावी लागल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. मात्र यंदा पावसात मैदानी परीक्षा असल्याने उमेदवारांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. याचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना

गेल्या भरतीच्या काही गैरप्रकार घडले होते.  परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. कॉपी, डमी आणि चिप अदलाबदली करण्याच्या घटना घडू नयेत याची खबरदारी घेतली आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.