योगेश खरे, झी मीडिया नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दुसरी चूल मांडल्यानंतरही अजित पवार गटाने शरद पवारांना (Sharad Pawar) विठ्ठलाची उपमा दिली होती. मात्र आता चित्र बदललं आहे. आता अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) आपलं दैवतच बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार गटानं शरद पवारांऐवजी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाणांचे (Yashwantrao Chavan) फोटो बॅनरवर (Banner) वापरायला सुरुवात केलीय. बॅनरवरुन शरद पवार गायब आहेत, त्या जागी यशवंतराव झळकताना दिसतायत. अजित पवार गटाला शरद पवारांनी आपले फोटो बॅनरवर वापरु नये अशी तंबी दिली होती, त्यानंतर चक्क नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या होल्डिंग्सवर पवारांऐवजी यशवंतरावांचे फोटो दिसलेत.
यशवंतरावांचेच फोटो का?
यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे राजकीय गुरु मानले जातात. यशवंतराव चव्हाणांनी पवारांना मानसपुत्र मानलं होतं. चव्हाण हे नाशिकमधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. चव्हाणांचा फोटो वापरत पवारांना शह देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. दरम्यान अजित पवार गटाच्या या खेळीवर शरद पवार गटानं टीकास्त्र सोडलंय. पण पवारांना डावलून यशवंतरावांचा फोटो वापरण्यात आल्यानं अजित पवार गटाच्या या खेळीची चर्चा होतेय..
अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतला होता. त्यानंतर शरद पवारांचा फोटो डावलत थेट यशवंतरावांचा फोटो अजित पवार गटाकडून वापरण्यात आलाय.. हा अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला चेकमेट करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय.
अजित पवारांना छुपा पाठिंबा?
राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये वादळी सुनावणी झाली....शिवसेनेला ज्या पद्धतीनं संख्याबळाच्या आधारावर चिन्ह दिलं गेलं, त्याचा दाखला अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर दिला. तर अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी मागणी शरद पवार गटानं केली.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीवर निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्वत: शरद पवार उपस्थित राहिल्यामुळे या बंडाला पवारांचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. आयोगाच्या पहिल्याच सुनावणीला थेट दिल्लीत जाऊन पवार हजर राहिल्यामुळे त्यांनी ही लढाई निकाराची केल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे या वयात पवार सर्व आघाड्यांवर स्वत: मैदानात उतरत आहेत. मग ते अजित पवारांसोबत गेलेल्या मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन थेट आव्हान देणं असो की भाजपविरोधात उघडलेल्या इंडिया आघाडीचा पुढाकार असो, पवार प्रत्येक आखाड्यात स्वत: शड्डू ठोकून उभे आहेत.