शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी

Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.   

श्वेता चव्हाण | Updated: Feb 27, 2024, 12:07 PM IST
शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी  title=

Shiv Sena Party Fund Case News In Marathi : निवडणूक आयोगाने शिंदे गट हीच खरी शिवसेना घोषित केले असताना उद्धव ठाकरे यांच्या गटाने पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढल्याची तक्रार शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केली आहे. परिणामी शिंदे गटाने ठाकरे गटाच्या विरोधातात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तपास सुरू केला आहे. याचदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेनेदेखील आयकर विभागाला पत्र लिहून उद्धव ठाकरे गटाचा कर कोण भरत आहे? याच माहिती मागवली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

शिवसेनेच्या पक्ष निधीवरुन पुन्हा एकदा राजकरण तापलं असून शिवसेनेच्या पक्ष निधी प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आहे. या चौकशीदरम्यान शिवसेना पक्षाचे निधी खाते कोण चालवते? आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले, त्या खात्यातून पैसे कोणी काढले याची माहितीही मागवण्यात आली असून बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारी 2023 मध्ये  एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे घोषित केले होते आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आले होते. त्यामुळे पक्षनिधीतून काढण्यात आलेल्या निधीवरून हे प्रकरण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही खरी शिवसेना नसून ते पक्ष निधी काढू शकत नाही. तरीही त्यांनी पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? असा सवाल शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेने नाव आणि चिन्ह धनुष्यबाण दिले. त्यानंतर आमदार पात्रता आणि अपात्रतेच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला असून शिवसेना पक्ष हा बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही नार्वेकर यांनी वैध मानली असता, शिंदे गटाचे सर्व आमदारांना पात्र ठरवले होते. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार निघून गेली होती.