विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : ठाकरे-शिंदे (Thackeray vs Shinde) वाद आता राजकारणापलिकडे गेला असून व्यक्तिगत पातळीवर आलाय. शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांना वारंवार आव्हान देतायत. त्यात आता ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) एकाच दिवशी एकाच मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे-शिंदेंचं होमपीच समजलं जाणा-या मुंबई-ठाण्यात नाही तर संभाजीनगर (Sambhaji Nagar) जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये (Sillod) हे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
संभाजीनगरमध्ये ठाकरे-शिंदे आमने सामने
7 नोव्हेंबरला अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) मतदारसंघात शिंदे-ठाकरेंची पुढची पिढी आमनेसामने येणार आहे. गेल्या काही दिवसात अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे एकमेकांवर जोरदार टीका करतायत. आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावं असं आव्हान सत्तारांनी दिलं, आदित्य यांना छोटा पप्पू, दोन नंबरचा पप्पू अस सत्तार सातत्यानं हिणवतायत. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी थेट सत्तारांच्या मतदारसंघातच धडक देण्याची रणनीती आखलीय.
अब्दुल सत्तारांवर मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंनी सिल्लोडमध्ये मेळावा घेण्याची घोषणा करताच त्यांना प्रतिआव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील मैदानात उतरलेत. आदित्य ज्यादिवशी सिल्लोडमध्ये सभा घेतील त्याचदिवशी श्रीकांत शिंदे सिल्लोडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. एकीकडे शिंदेंच्या सभेला तुफान गर्दी जमवायची आणि आदित्य ठाकरेंच्या सभेला गर्दी होऊ द्यायची नाही याची जबाबदारी खुद्द अब्दुल सत्तारांनी उचलल्याचं समजतंय.
हे ही वाचा : सत्तेचा फेरा, तरीही ईडीचा ससेमीरा, प्रताप सरनाईक यांची प्रॉपर्टी ED जप्त करणार
संभाजीनगरमध्ये पुढच्या पिढीचा सामना
आदित्य सध्या महाराष्ट्र दौरा करतायत, लोकांमध्ये फिरतायत. त्यांच्या सभांना,रोडशोला तुफान गर्दी होतेय. सत्तारांनी डिवचल्यामुळेचे आदित्य ठाकरेंनी त्यांना बालेकिल्ल्यात जाऊन आव्हान देण्याचं ठरवलंय. पण आता सत्तारांनीही श्रीकांत शिंदेंना मैदानात उतरवल्यानं सिल्लोडमध्ये ठाकरे विरूद्ध शिंदेंच्या पुढच्या पिढीचा सामना रंगणार आहे. आता 7 नोव्हेंबरला कोण मैदान मारणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.