औरंगाबाद बनतंय सभांचं हॉटस्पॉट, राजसभेनंतर आता इतरांच्याही सभांचा धडाका

राजकीय पक्षांचं मिशन मराठवाडा, जनता कोणाच्या पाठिशी उभी राहणार?

Updated: May 9, 2022, 09:33 PM IST
औरंगाबाद बनतंय सभांचं हॉटस्पॉट, राजसभेनंतर आता इतरांच्याही सभांचा धडाका  title=

Maharashtra Politics : मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादेतून एल्गार पुकारला आणि आता हेच औरंगाबाद सभांचं हॉटस्पॉट बनू लागलंय. राज ठाकरेंपाठोपाठ MIMनेही औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केलीय. औरंगाबाद आ रहा हू मै..असं ट्टिट करत MIM खासदार इम्तियाज जलील यांनी ओवेसींच्या सभेचे संकेत दिले आहेत. 

असददुद्दीन ओवेसी शाळेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त औरंगाबादमध्ये येतायेत. मात्र MIMचं लक्ष्य औरंगाबाद महापालिकाच असणारंय. दुसरीकडे भाजपनेही आपला मोर्चा औरंगाबादकडे वळवलाय. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर येत्या 10 दिवसांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणारंय. 

तर याच महिन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची सभा औरंगाबादेत होणार असून या सभेचा समारोप अमित शाहा करणार आहेत.  विशेष म्हणजे ज्या सांस्कृतिक मैदानात राज ठाकरेंची सभा झाली तिथंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा घेण्याची घोषणा शिवसेनेनं केलीय. 8 जूनला ही सभा होईल. या सभेत गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील असा दावा शिवसेना नेते करतायेत. 
 
मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकांसोबत इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. राजसभेनंतर मराठवाड्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शिवसेना आणि MIMचा प्रभाव कमी करण्यासाठी इथं भाजपनं कंबर कसलीय. 

मराठवाड्यावर वर्चस्व दाखवण्यासाठी संभांमधून राजकीय पक्षांनी कितीही जोरात भोंगे वाजवले तरी जनता खऱ्या अर्थानं कुणाच्या पाठीशी आहे हे मात्र निवडणुकीत कळेल.