सत्तास्थापनेसाठी समाजवादी पार्टी शिवसेनेला पाठींबा देण्यास तयार पण...

 शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत समाजवादी पार्टीने हिरवा कंदील दाखवला आहे.

Updated: Nov 20, 2019, 08:56 AM IST
सत्तास्थापनेसाठी समाजवादी पार्टी शिवसेनेला पाठींबा देण्यास तयार पण...

मुंबई : महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी महाशिवआघाडीच्या बैठकांवर सुरु आहेत. किमान एकसुत्री कार्यक्रमावर तीनही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बदलत्या विधानामुळे आता शिवसेनाही फुंकून पाऊल टाकत आहे. सत्तास्थापने संदर्भात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अल्टीमेटम दिल्याची माहिती 'झी न्यूज'ला सुत्रांनी दिली आहे. या पार्श्वभुमीवर छोट्या सहयोगी पक्षांशी चर्चा करुन शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत समाजवादी पार्टीने हिरवा कंदील दाखवला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन आमदार असलेल्या समाजवादी पार्टीच्या अबू आझमी शिवसेनेसोबत जाण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. पण यासाठी काही अटी असतील असेही ते म्हणत आहेत. शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा दूर ठेवून किमान एकसूत्री कार्यक्रमावर बोलण्यास तयार असेल तर आम्हाला राज्यात शिवसेनेसोबत एनसीपी आणि काँग्रेस सरकारमध्ये जाण्यास हरकत नसेल असे अबू आझमी म्हणाले. पण यासंदर्भातील शेवटचा निर्णय हा अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतरच होईल असेही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार चालावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पूर्ण पाच वर्षे सरकार चालावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपापसातही काही गोष्टींवर चर्चा करत आहेत. त्यामुळे वेळ लागेल. दिल्लीतही चर्चा सुरु असल्याचे थोरात म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना आल्यानं त्यांनी सत्ता स्थापनेचा निर्णय जलदगतीन घ्या अशी मागणी केली आहे. यासाठी ते काँग्रेस-राष्ट्रवादीला १ डिसेंबरची मुदतही देऊ शकतात. एक डिसेंबर पर्यंत सरकार स्थापन न झाल्यास शिवसेना दुसऱ्या पर्यायाचा  विचार करु शकते अशी माहिती 'झी न्यूज'च्या सूत्रांनी दिली आहे.

पवार आणि सोनियांच्या सोमवारच्या भेटीत सत्तास्थापनेची काहीच चर्चा झाली नाही, असं पवार सांगत होते, म्हणजेच तेव्हाच सगळं फुल अँड फायनल झालं होतं.त्यावर काँग्रेस चौकडीच्या सकाळच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. तिकडे शिवसेनेनंही पुढच्या चर्चेची तयारी केली आहे. शुक्रवारी मातोश्रीवर आमदारांबरोबर महत्त्वाची बैठक होतेय. संपूर्ण तयारीनिशी या... असं आमदारांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसात ती सो कोल्ड बातमी कुणाकडून तरी मिळेलच, असं आता तरी दिसत आहे.