IPL 2025 Mega Auction : जगातील सर्वात मोठ्या टी 20 लिगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएल 2025 मेगा ऑक्शन सौदी अरेबियामध्ये 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार असून यासाठी देश विदेशातील 1574 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. सौदी अरेबियामध्ये महिन्याभरापासून या ऑक्शनची तयारी करण्यात येत आहे हे ऑक्शन पूर्वीच्या तुलनेत फारच भव्यदिव्य असेल. मात्र या ऑक्शनमध्ये लिलावकर्त्याची भूमिका कोण निभावणार याविषयी बरीच चर्चा होती, मात्र आता हे नाव समोर आलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार यंदाच्या आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये लिलावकर्त्याची भूमिका मल्लिका सागर निभावणार आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये सुद्धा मल्लिका सागर हीच लिलावकर्ती होती. मागच्यावर्षी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मल्लिका सागर हिने महिला लिलावकर्तीची जबाबदारी पार पडली होती. यापूर्वी रिचर्ड मेडेली, ह्यू एडमीड्सवर, चारू शर्मा या पुरुष लिलावकर्त्यांनी आयपीएलमध्ये खेळाडूंचे लिलाव केले होते. मल्लिका सागरच्या कामाने प्रभावित होऊन पुन्हा एकदा बीसीसीआयने आयपीएल मेगा ऑक्शनसाठी मल्लिका सागर हिच्यावर खेळाडूंचा लिलाव करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
THE AUCTIONEER FOR IPL MEGA AUCTION 2025 - MALLIKA SAGAR [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/xkYNxYR0el
— Johns. (CricCrazyJohns) November 15, 2024
मल्लिका सागर हिने आयपीएल 2024 पूर्वी महिला प्रीमियर लीग 2023 आणि 2024 तसेच प्रो कबड्डी लीगच्या ऑक्शनमध्येही लिलावकर्तीची भूमिका निभावली होती. मलिका सागर आडवाणी ही मुंबईची असून ती आधुनिक आणि समकालीन भारतीय कला केंद्र मुंबईची सल्लागार आहे. याशिवाय आर्ट इंडिया कन्सल्टट्स फर्ममध्येही ती भागिदार आहे.
आयपीएल ऑक्शन दुसऱ्यांदा परदेशात आयोजित करण्यात आले असून 2024 चं मिनी ऑक्शन सुद्धा दुबईत झाला होता. IPL मेगा ऑक्शनसाठी जगभरातून एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली. आता ही यादी आयपीएल आणि फ्रँचायझी यांच्यातील चर्चेमुळे कमी होणार आहे. प्रत्यक्ष ऑक्शनसाठी 500 ते 600 खेळाडू निवडले जाऊ शकतात. नोंदणी केलेल्या 1574 खेळाडूंमध्ये 320 कॅप खेळाडू, 1224 अनकॅप खेळाडू आणि असोसिएट नेशन्समधील 30 खेळाडूंचा समावेश आहे. 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्ष आयपीएलसाठी एकूण 204 स्लॉट्स आहेत.
आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे एकूण 120 कोटी असतात. यापैकी काही पैसे हे खेळाडूंना रिटेन करण्यासाठी खर्च केले जातात आणि इतर रक्कम ही मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी वापरली जाते. पंजाब किंग्स - 110.5 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 83 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स - 73 कोटी, गुजरात टायटन्स - 69 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स - 69 कोटी, चेन्नई सुपर किंग्स - 55 कोटी, मुंबई इंडियन्स - 45 कोटी, कोलकाता नाइट राइडर्स - 51 कोटी, सनराइजर्स हैदराबाद - 45 कोटी, राजस्थान रॉयल्स - 41 कोटी.