बिबट्याने लेकाला ओढून नेलं, पण बापाने जीवाची बाजी लावत मुलाला वाचवलं

लेकासाठी बिबट्याला भिडला, जिगरबाज बापाची थरारकाप उडवणारी कहाणी

Updated: Jan 21, 2022, 05:30 PM IST
बिबट्याने लेकाला ओढून नेलं, पण बापाने जीवाची बाजी लावत मुलाला वाचवलं title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा :  कराडच्या किरपे गावातील शिवारात वडीलांच्या समोरच पाच वर्षाच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. मात्र या मुलाच्या वडिलांनी दाखवलेल्या धेर्या मुळे या बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडविण्यात वडिलांना यश आलं. सध्या या जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना काय घडली?
कराड तालुक्यातील किरपे इथं धनंजय देवकर शेतीचे काम उरकून घरी येण्यासाठी निघाले. त्यांचा ५ वर्षांचा मुलगा राज देवकर हा शेती अवजार वडिलांना उचलून देण्यासाठी खाली वाकलेला असताना अचानक शेतातून बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्या मुलाच्या मानेला पकडून ओढत शेतात घेऊन जाऊ लागला.

पण प्रसंगवधान राखत अतिशय धैर्याने राजचे वडिल थेट बिबट्याला भिडले. शेतालगत असलेल्या तारेच्या कुंपणात बिबट्या अडकल्याने त्याला पुढे जात येत नव्हतं. मुलाचा वडिलांनी सुरू ठेवलेला प्रतिकार आणि तारेचं कुंपण यामुळे बिबट्याला अखेर हार मनात मुलाला सोडावं लागलं.

सुदैवाने मुलगा सुटला मात्र जखमी झाल्याने त्याला कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राज देवकर या मुलाच्या मानेला आणि कानाला दात जोरात लागले आहेत, तर पाठेवर आणि पायावर किरकोळ जखमा झाल्या आहेत.

सदाभाऊ खोत यांनी घेतली भेट,
या जखमी मुलाची आणि त्याच्या वडिलांची माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. या घटनेनंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पिंजऱ्यातले प्राणी माणसावर हल्ले करू लागले आहेत आणि वन खात्याचा कारभार असणारे मुख्यमंत्री पिंजऱ्यातून बाहेर यायला तयार नाहीत अशी टीका केली आहे.