मुंबई : १०वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थी आणि पालक वाट पाहत आहेत. मात्र, आता विद्यार्थ्यांची ही प्रतिक्षा आता संपणार असल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १०वीच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. १० जूनपर्यंत निकाल जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, शिक्षण मंडळातर्फे अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.
बोर्डाच्या www.mahresult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१८ मध्ये १०वीची परीक्षा घेण्यात आली होती. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ९ लाख ७३ हजार १३४ मुले आणि ७ लाख ७८ हजार २१९ मुलींचा समावेश आहे.
राज्यातील २१ हजार ९८६ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये नियमित विद्यार्थी १६ लाख ३७ हजार ७८३ असून तर ६७ हजार ५६३ पुनर्परीक्षार्थी आणि ४६ हजार ७ इतर विद्यार्थी आहेत.