Maharashtra Tourism: नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. आता काही दिवसांत गोड गुलाबी थंडी सुरू होईल. अशावेळी अनेकांची पावलं थंड हवेच्या ठिकाणी वळतात. कामाच्या गराड्यातून लोकांना अल्हाददायक व शांत ठिकाणी वेळ घालवायला जास्त आवडते. अलीकडेच सर्वच हिल स्टेशन लोकांना माहिती झाल्याने तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळं या गर्दीत फिरण्याची मज्जा येत नाही तसंच, कुटुंबासोबत वेळदेखील मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला एका अपरिचीत हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत. हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे हिल स्टेशन आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे हिल स्टेशन हे तर महाबळेश्वर आहे. पण तुम्हाला माहितीये का दुसऱ्या क्रमांकाचे हिल स्टेशन कोणते आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात हे पर्यटनस्थळ आहे. तीन राज्यातील लोक या ठिकाणी येतात. महाराष्ट्र, गुजराज, मध्यप्रदेशातील लोक येथे वेळ घालवण्यासाठी येतात. समुद्रसपाटीपासून 1143 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे.
सातपुडा पर्वतरांगामधील हे हिलस्टेशन आहे. खूप कमी जणांना या पर्यटनस्थळाबद्दल माहिती आहे. तोरणमाळला पोहोचण्यासाठी डोंगराला तब्बल सात फेऱ्या माराव्या लागतात तेव्हा कुठे तोरणमाळला पोहोचता येते. थंडीच्या दिवसांत येथील वातावरण अल्हाददायक असते तसंच त्यामुळं येथे आल्यावर जणू स्वर्गच पाहत असल्याचा भास होतो. पर्यटकही शांत व रम्य ठिकाण असल्याने पर्यटकांना येथे आल्यावर छान वाटते.
या प्रदेशात तोरणाची झाडे होती त्यामुळं याला तोरणमाळ असं नाव पडलं. येथून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. या तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जादेखील देण्यात आला आहे. येथे अनेक औषधी आणि बहुपयोगी वनस्पती आढळतात. तोरणमाळचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, यशवंत तलाव. या तलावात बाराही महिने पाणी असते.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात हे थंड हवेचे ठिकाण आहे. रस्तेमार्गाने धुळ, नंदूरबार आणि शहादा ते तोरणमाळपर्यंतची सरकारी बससेवा देखील आहेत. तसंच, नंदुरबार आणि दोंडाई हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
तोरणमाळचा जाण्याचा योग्य काळ हा ऑक्टोबर ते मे महिन्याचा आहे. या काळात येथे खूप जास्त थंडी पडते. यावेळी तुम्ही सातपायरी घाट, सिताखाई पाँईट, औषधी वनस्पती उद्यान, लेघापाणी उद्यान व गुफा, कमळ तलाव, सनसेट पाँइट, हिरवेगार डोंगर-दऱ्या हे प्रेक्षणीय स्थळ पाहू शकात.