Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांमध्ये महायुतीने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र मतमोजणीच्या पहिल्या चार तासांमध्ये दिसत आहे. महायुतीने एकूण 220 जागांवर आघाडी मिळवली असून भारतीय जनता पार्टी सर्वात मोठ पक्ष ठरणार असं स्पष्ट होत आहे. भाजपाचा स्ट्राइक रेट हा 80 टक्क्यांहून अधिक असेल असं चित्र सध्या दिसत आहे. भाजपाने 127 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाबरोबरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 56 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 38 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळेच राज्यात महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील याबद्दलच्या चर्चा सुरु असतानाच भाजपाचे नेते प्रवीण दरेकरांनी थेट नाव घेत मुख्यमंत्री कोण असेल हे सांगितलं आहे.
प्राथमिक कलांमध्ये भाजपाने 100 चा टप्पा ओलांडल्यानंतर प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी, "जे धर्मयुद्ध देवेंद्र फडणवीसांनी पुकारलं होतं त्यामधील आम्ही सगळे एक आहोत हा नारा जनतेनं मान्य केला. मला वाटतं केंद्रात भाजपा सरकार, एनडीए सरकार असेल आणि महाराष्ट्राही भाजपा सरकार असेल तर राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने जाईल म्हणूनच जनतेनं मतदान केलं आहे," असं म्हटलं.
दरेकरांनी लाडक्या बहिणींचेही आभार मानले. "आम्ही कोणत्या शब्दांमध्ये मतदारांचं आभार मानावं हे समजत नाही. विजयाची खात्री होती. मात्र एवढा मोठा आशिर्वाद जनता देईल असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना मी सॅल्यूट करतो. त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो. आमच्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे," असंही दरेकर म्हणाले.
खरी शिवसेना कोणती याबद्दल विचारण्यात आलं असता, "कोणती शिवसेना खरी, खोटी याचा निकाल लोकांना दिला आहे. मराठी जनता आणि शिवसैनिकांनी दिला असून ते शिंदेंच्या पाठीशी आहेत," असं दरेकर म्हणाले.
फडणवीस मुख्यमंत्री होणार का यासंदर्भात विचारण्यात आलं असता, "मी एक सांगू शकतो की महायुतीचे मुख्यमंत्री होणार. सहाजिक आहे जो पक्ष मोठा असतो त्याला अधिक संधी असते. भाजपा आज 125 च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर फडणवीसच मुख्यमंत्री होतील," असं दरेकरांनी म्हटलं आहे.