Maharashtra Vidhansabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, इथं नवी मुंबई आणि मुंबईतील त्यांच्या चाहीर सभांकडे सर्वांचच लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत शिवाजी पार्क या महत्त्वाच्या ठिकाणी मोदींची सभा पार पडणार असल्यामुळं ते या सभेत नेमकं काय बोलणार याचविषयीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरलेला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांनाच आव्हान दिलं.
भाजपच्या भूमिकेवर निशाणा साधत राऊतांनी शाब्दिक तोफ डागली. 'मोदींनी मागील दहा वर्षात असं काही केलेले नाही की त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतील. आम्हाला तरी तसे देशात काहीच दिसले नाही,' असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या एकंदर भूमिकेवर नाराजीचा सूर आळवला. 'जो देश पंडित नेहरू इंदिरा गांधी यांनी घडवला त्या देशाला मोदींनी मागील दहा वर्षात मागे नेले, मोदिंनी मागील दहा वर्षात काय केलं याची उजळणी करण्याची संधी जर आम्हाला दिली तर बर होईल', असं म्हणत त्यांनी कटाक्ष टाकला.
'मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचा सरकार बसवलं आहे. त्यांनी आजच्या सभेत छातीवर हात ठेवून सांगायचं की मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली की नाही', अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांना आव्हान दिलं. 'मोदी प्रचार संपल्याबरोबर ब्राझीलच्या दौऱ्यावर जाणार आहेत ते नेहमी विदेशात दौरे करत असतात हा आधुनिक भारताचा शिल्पकार भारतात थांबत असतो का?' अशा शब्दांत त्यांनी थेट सवाल केला.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना त्यांनी येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 'आमचं सरकार आल्यानंतर पुढील सहा महिन्यात दिल्लीतील मोदी सरकार डळमळीत होईल. म्हणूनच मोदी अमित शहा यांच्यासह अख्ख केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरते आहे', अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या प्रचारतंत्रावरही टीका केली.