पावसाळ्यात सांदण व्हॅलीला भेट द्यायचा प्लॅन करताय? ही बातमी वाचाच!

Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 17, 2024, 02:26 PM IST
पावसाळ्यात सांदण व्हॅलीला भेट द्यायचा प्लॅन करताय? ही बातमी वाचाच! title=
maharashtra village sandhan valley remain closed for next four months due to monsoon

Sandhan Valley: मान्सूनची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागात मान्सूनने हजेरी लावली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. गड- किल्ले, धबधबा किंवा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची पावलं वळतात. आपला महाराष्ट्र निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. अशावेळी पर्यटक या पर्यटनस्थळी गर्दी करतात. मुंबईजवळचा अहमदनगर जिल्हाही सौंदर्याने नटलेला आहे. तुम्हीदेखील पावसाळ्यात नगरला फिरण्यासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. अहमदनगर जिल्ह्यातील सांदण दरी येथे पर्यटकांना पुढील चार महिने प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे आशिया खंडातील सर्वात खोल अशी सांदण दरी आहे. प्रत्येक वर्षी देशभरातील हजारो पर्यटक सांदण दरीला भेट देत असतात. मात्र पावसाळ्यात या दरीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने चार महिने सांदण दरी येथे प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सांदण दरीला भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. मागील वर्षी जून महिन्यात अचानक आलेल्या पावसामुळं तब्बल 500 पर्यटक अडकले होते. मात्र, वनविभाग आणि इतर सुरक्षा रक्षकांनी वेळीच मदत केल्याने या पर्यटकांचे प्राण वाचवले होते. त्यामुळं पावसाळण्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते. पावसाचं पाणी याच दरीतून खाली कोसळते. पावसामुळं दरीमध्ये पाणी साचते आणि पाण्याचा ओघ वाढल्याने बाहेर पडणे अशक्य होते. त्यामुळं अशा परिस्थितीत पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते. सांदण दरीला भेट देण्यासाठी हिवाळा व उन्हाळा या दिवसांत जाणे खूप उत्तम ठरु शकते. 

माथेरानमध्ये तरुणी दरीत कोसळली

माथेरान जवळ पेब किल्ल्यावर दरीत कोसळलेल्या मुंबईतील तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात माथेरान सह्याद्री रेस्क्यु टीमला यश आलं आहे. रिया साबळे असं तिचं नाव असून तिला उपचारांसाठी कर्जतच्या रायगड हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील अंधेरी येथील 10 -12 तरुण तरुणींचा ग्रुप माथेरान इथं फिरायला आला होता. ते पेब किल्ल्यावरून परतत असताना निसरड्या पायवाटेवरून रियाचा पाय घसरला आणि ती दरीत कोसळली. काही अंतरावर जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या रियाला माथेरान येथील सह्याद्री रेसक्यू टीमने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.