Russia Cancer Vaccine: कर्करोगावरील लस शोधून काढण्यात आम्हाला यश आलं आहे, असा दावा रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. तसंच, ही लस तिथल्या नागरिकांना मोफत देण्याची घोषणादेखील केली आहे. डेली मेलच्या एका अहवालानुसार, रशिया आरोग्य मंत्रालयाच्या रेडियोलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे वरिष्ठ एंड्री काप्रिन यांनी म्हटलं आहे की, 'नागरिकांसाठी ही लस 2025च्या सुरुवातीलाच लाँच केले जाईल.'
रिपोर्टनुसार, ही लस कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी असणार आहे. तर ट्युमर बनण्यासापासून रोखण्यासाठी या लशीचा वापर होणार नाहीये. रशियाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या वक्तव्यानुसार, ही लस कर्करोगाच्या रुग्णांसाठीच तयार केली जाईल. पश्चिमात्य देशात तयार होणाऱ्या कॅन्सर व्हॅक्सीनप्रमाणेच हीदेखील लस आहे. मात्र ही लस कशाप्रकारे कर्करोगाचा इलाज करणार, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
कर्करोगावरील ही लस किती प्रभावशील असेल आणि रशिया लस कशाप्रकारे लाँच करेल व देशभरात लागू करेल, हे समोर आलेले नाहीये. इतकंच काय तर या लशीचे नावदेखील अद्याप समोर आलेले नाहीये. जगभरातील इतर देशांप्रमाणेच रशियातही कँन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 2022मध्ये कर्करोगाचे 635,000 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. रशियात कोलन, स्तन आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण सामान्य आहे.
व्यक्तिगत कर्करोगाच्या लसीच्या माध्यमातून रोगप्रतिकार शक्ती आणि रुग्णांना गरजेचा असलेल्या विशिष्ट प्रोटीन ओळखता येतील आणि त्यावर काम करता येईल. त्यासाठी लशीत रुग्णांच्या ट्युमरच्या जीनसंबंधित सामग्री ज्याला RNA असं याचा वापर केला जातो.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी अलीकडेच म्हटलं होतं की, देशातील शास्त्रज्ञ कर्करोगाच्या लशीवर काम करत आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रपतींनी म्हटलं होतं की, आम्ही कर्करोगावरील लस आणि नवीन पिढीची इम्यूनोमॉड्युलेटरी औषधांच्या निर्मितीपर्यंत जवळपास पोहोचलोच आहोत. अन्य देशांनीदेखील व्यक्तिगत कर्करोगाच्या लस निर्माण करण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. याआधी मेमध्ये फ्लोरिडा विद्यापिठाच्या संशोधकांनी चार रुग्णांवर एका लशीचे परीक्षण केले होते.
जागतिक आरोग्य संस्थेनुसार, सध्या ह्युमन पेपिलोमावायरस (एचपीवी)साठी सहा लशी उपलब्ध आहेत. जे सर्व्हायकल कँन्सरसह अनेक कर्करोगांवर मात्रा ठरु शकते. त्याचबरोबर हेपेटायटिस बीसाठीही लशी आहेत. जे लिव्हर कॅन्सरवर मात्रा ठरु शकतात. करोना व्हायरसच्या महामारीदरम्यान रशियाने कोविड 19साठी स्पुतनिक वी वॅक्सिन बनवली होती आणि अनेक देशांना विक्रीदेखील केली होती.