प्रेमी वनरक्षक बनले भक्षक, जंगलात नेऊन प्राध्यापक पतीचा काढला काटा

पतीची हत्या करुन ती सासरी आली आणि पतीची चौकशी करु लागली... असा झाला पर्दाफाश

Updated: Aug 7, 2022, 07:25 PM IST
प्रेमी वनरक्षक बनले भक्षक, जंगलात नेऊन प्राध्यापक पतीचा काढला काटा title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : वनरक्षक पत्नीने आपल्या प्रियकराच्या साहाय्याने पतीचा खून केल्याची घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. पत्नी धनश्री आणि तिचा प्रियकर शिवम यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट इथल्या निर्जनस्थळी प्रा. सचिन देशमुखची 31 जुलैला रात्री गळा आवळून हत्या केली. यानंतर सचिनचा मृतदेह यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील सिंगद इथल्या पुलाखाली फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

काय आहे नेमकी घटना?
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातील प्रा. सचिन देशमुख यांची पत्नी अकोला जिल्हयातील अकोट इथल्या पोपटखेड बीटमध्ये वनरक्षक म्हणून कार्यरत होती. यामुळे पत्नीला भेटण्यासाठी दर शनिवार, रविवारी सचिन देशमुख अकोटला येत असायचे. 31 जुलैला सुद्धा सचिन अकोट इथे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आले.

सचिन आणि त्यांची पत्नी धनश्री बोलता बोलता एका निर्जनस्थळी गेले. काही वेळाने तिथे धनश्रीचा प्रियकर वनरक्षक शिवम तिथे पोहोचला. यावेळी सचिन आणि शिवमध्ये दोरदार भांडण झालं. रागाच्या भारत शिवमचा गळा दाबला यात सचिन बेशुद्ध पडला. यानंतर दोघांनी सचिनला कारमध्ये बसवलं. कारमध्ये शिवमने ओढणीने गळा आवळून सचिनची हत्या केली.

धनश्रीने रचला बनाव
कुणाला संशय येऊ नये म्हणून दोघांनी सचिनचा मृतदेह यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथल्या सिंगदच्या पुलाखाली फेकून दोघेही अकोटला निघून गेले. यानंतर धनश्रीने दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्टला उमरखेड इथे सचिनच्या कुटंबीयांना फोन करीत सचिनबाबत विचारपूस केली.मात्र सचिन घरी पोहोचला नसल्याचे त्यांनी सांगितलं. त्यानंतर धनश्री उमरखेडला पोहचली

त्याच दिवशी पोलिसांना सचिनचा मृतदेह सापडला. सचिनची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. यवतमाळ पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. सचिन तसंच धनश्री आणि शिवमचा कॉल डेटा तपासण्यात आला. यावेळी सचिनचं शेवटचं बोलणं धनश्रीबरोबरच झाल्याचं समोर आलं.

हत्याकांडाला प्रेम प्रकरणाची किनार
प्रेम प्रकरणातून पत्नी धनश्रीने तिचा प्रियकर शिवमच्या मदतीने सचिनची हत्या करून मृतदेह सिंगदच्या पुलाखाली फेकल्याचे निष्पन्न झाले. यवतमाळच्या एलसीबी पथक आणि सायबर सेलने अमरावती जिल्ह्यातील परतवाडाला जाऊन शिवमचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नव्हता. तीन दिवसांपासून शिवम कर्तव्यावर सुद्धा हजर नसल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला. शिवमबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळवून त्याला चिखलदरा इथल्या एका रिसोर्टवरून ताब्यात घेतलं.

पोलिसांनी मारेकरी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे..