हल्ली आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक आहे. मग अगदी सकाळी वापरल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशवीपासून ते अगदी झोपताना पाणी पिण्याकरिता घेतल्या जाणाऱ्या बॉटलपर्यंत. पण एका संशोधनात अतिशय धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एक व्यक्ती त्याच्या आहारासोबतच वर्षभरात कमीत कमी 5.2 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 260 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक गिळत आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण क्रेडिट कार्ड एवढं प्लास्टिक एका आठवड्याला खात आहोत. ऑस्ट्रेलियाच्या न्यूकॅसल युनिर्व्हसिटीचे प्रोफेसर धावा पलानीसामी यांनी केला आहे. तसेच एम्समधील कार्यक्रमात सादर केला आहे.
मायक्रोप्लास्टिक्स हे अत्यंत लहान आकाराचे प्लास्टिकचे कण आहेत. जे अन्न आणि श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. हे धोकादायक कण नळाचे पाणी, बाटलीबंद पाणी, मध, मीठ आणि अगदी बिअरमध्ये आढळतात. सी फूडमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे. महासागरांमध्ये असलेला प्लास्टिकचा कचरा सागरी प्राण्यांच्या माध्यमातून मानवापर्यंत पोहोचतो. याशिवाय हवेतील मायक्रोप्लास्टिक्स श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात.
एम्सच्या प्राध्यापिका डॉ. रीमा दादा यांच्या मते, मायक्रोप्लास्टिकमुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे मधुमेह, थायरॉईड, मज्जासंस्थेचे विकार, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. त्यामुळे वंध्यत्व देखील होऊ शकते.
प्रोफेसर धावा यांच्या अभ्यासानुसार, बहुतेक मायक्रोप्लास्टिक्स नळाचे पाणी आणि बाटलीबंद पाण्यात आढळले आहेत. बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय मीठ, मध, साखर यांसारख्या गोष्टीही प्लास्टिकमुळे दूषित होतात.
प्लास्टिक हे शरीराच्या अवयवांसह ऊतींमध्ये जमा होते. हे सेर्टोली पेशी, जेम्स पेशी आणि इतरांवर परिणाम करते. यामुळे शरीराच्या अनेक भागांना गंभीर इजा होऊ शकते. यामुळे महिलांमध्ये वंध्यत्व, पुरुषांमध्ये नपुंसकता, मधुमेह, मज्जासंस्थेचे विकार, थायरॉईड, कर्करोग आणि इतर आजारांचा धोका वाढतो.
उंदरांवरील संशोधनादरम्यान असे आढळून आले की, त्यांना जास्त प्लास्टिक दिल्याने त्यांच्या अंडाशयांना इजा होते. अंडाशयांचे संरक्षण करणाऱ्या पेशींवरही परिणाम झाला. त्यामुळे अंडाशयाचा साठा कमी झाला. यामुळे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), वंध्यत्व होऊ शकते. प्लास्टिकमध्ये अनेक रसायने असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. हे आपल्या अंतःस्रावी प्रणालीवर परिणाम करतात. याचा आपल्या शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)